PM Modi BRICS Summit 2023 : पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर; ब्रिक्स परिषदेत होणार सहभागी
PM Modi BRICS : ब्रिक्स गटाच्या परिषदेसाठी पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहेत.
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या ब्रिक्स (BRICS) देशांच्या परिषदेत पंतप्रधान उपस्थित राहणार आहेत. ब्रिक्स परिषद (BRICS Summit 2023) ही 22 ते 24 ऑगस्ट दरम्यान दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्गमध्ये पार पडणार आहे. परराष्ट्र मंत्रालयाने या दौऱ्याची शुक्रवारी माहिती दिली.
परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ग्रीसचे पंतप्रधान किरियाकोस मित्सोटाकिस यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी शुक्रवारी (25 ऑगस्ट) रोजी ग्रीसला भेट देतील. 40 वर्षांनंतर भारताच्या पंतप्रधानांचा ग्रीस दौरा या निमित्ताने होणार आहे.
'ब्रिक्स'मध्ये शी जिनपिंगही राहणार उपस्थित
'ब्रिक्स' परिषदेत चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंगही सहभागी होणार आहेत. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुआंग यांनी सांगितले की, "शी जिनपिंग दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा यांच्या निमंत्रणावरून शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत." ब्रिक्स गटात भारताव्यतिरिक्त चीन, रशिया, दक्षिण आफ्रिका आणि ब्राझील यांचा समावेश आहे.
PM Modi will visit Johannesburg, South Africa from 22-24 August 2023 to attend the 15th BRICS Summit. The PM will make an official visit to Greece on 25 August at the invitation of Kyriakos Mitsotakis, Prime Minister of Greece. This will be the first visit by an Indian Prime… pic.twitter.com/rxGUdTP82c
— ANI (@ANI) August 18, 2023
ब्रिक्स काय आहे?
'ब्रिक्स' हे भारत, ब्राझील, रशिया, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांच्या शिखर संघटनेचे संक्षिप्त नाव आहे. सुरुवातीला फक्त चार देश या संघटनेचे सदस्य होते आणि 'ब्रिक' या संक्षिप्त नावाने ओळखले जात होते. 2010 मध्ये दक्षिण आफ्रिका देशही या गटात सहभागी झाल्यानंतर संघटनेचे नाव 'ब्रिक्स' झाले.
गटातील देशांची अर्थव्यवस्था वृद्धिंगत होण्यासाठी निधी उपलब्ध करणे , परस्परांतील आर्थिक सहकार्य वाढवणे, आर्थिक सुरक्षितता मजबूत करणे , इत्यादी या संघटनेची उद्दिष्ट व कार्ये आहेत.
'ब्रिक्स' परिषदेत पुतिन उपस्थित राहणार नाहीत
रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन ब्रिक्स परिषदेत सहभागी होणार नाहीत. आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने (ICC) युक्रेन युद्धातील त्याच्या भूमिकेबाबत वॉरंट जारी केले आहे. दक्षिण आफ्रिका आयसीसीवर स्वाक्षरी करणारा देश असल्याने पुतिन यांच्या आगमनाने राजनैतिक समस्या निर्माण होऊ शकते. तर, चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी 2018 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला होता. या वर्षी होणार्या ब्रिक्स शिखर परिषदेत संघटनेच्या विस्ताराचा अजेंडा असणार आहे.