Corona Vaccine Certificate : कोरोना लस प्रमाणपत्रावर पंतप्रधान मोदींचा फोटो कशासाठी? काँग्रेस खा. केतकरांच्या प्रश्नावर सरकारचं उत्तर
कोरोनाच्या सर्टिफिकेटवर पंतप्रधानांचा फोटो का लावण्यात आला आहे, या आधीच्या सरकारांनी पोलिओ लसीच्या सर्टिफिकेटवर पंतप्रधानांचा फोटो लावला होता असा सवाल राज्यसभेचे खासदार कुमार केतकरांनी विचारला होता.
नवी दिल्ली : कोरोनाच्या लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर नागरिकांना एक सर्टिफिकेट देण्यात येतं. त्या सर्टिफिकेटवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो छापण्यात आला आहे. पंतप्रधानांचा फोटो हा केवळ व्यापक जनहितासाठी असून तो लसीकरणानंतरही कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करण्यासंबंधी जागरुकता निर्माण करण्यासाठीच लावण्यात आला असल्याचं केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवारांनी संसदेत सांगितलं.
काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार कुमार केतकरांनी या संबंधी एक प्रश्न विचारला होता. कोरोनाच्या लसीकरणाच्या सर्टिफिकेटवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो का लावण्यात आला आहे, तशी त्याची गरज आहे का किंवा ते बंधनकारक करण्यात आलं आहे का आणि यामागे काय कारण आहे असा प्रश्न खासदार कुमार केतकरांनी राज्यसभेत विचारला होता.
कुमार केतकरांच्या या लिखित स्वरुपाच्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार म्हणाल्या की, "कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवर पंतप्रधानांचा फोटो हा व्यापक जनहितासाठीच लावण्यात आला आहे. लस घेतल्यानंतरही लोकांमध्ये कोरोनाच्या नियमांबद्दल जागरुकता निर्माण करण्याासाठी हा फोटो लावण्यात आला आहे. कोरोनाच्या नियमांबद्दल लोकांमध्ये परिणामकारक जागरुकता निर्माण करणे ही सरकारची नैतिक जबाबदारी आहे."
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार पुढे म्हणाल्या की, "आपल्या देशातील कोरोना लसीचे सर्टिफिकेट तयार करताना जागतिक आरोग्य संघटनेने आखून दिलेल्या मानदंडांचे पालन करण्यात आलं आहे."
'या' प्रश्नाचे उत्तर नाही
या आधीच्या केंद्र सरकारांनी पोलिओ आणि इतर प्रकारच्या लसींचेही प्रमाणपत्रक दिले आहेत. त्या प्रमाणपत्रावर आधीच्या पंतप्रधानांचा फोटो छापणं बंधनकारक केलं नव्हतं का किंवा आवश्यक केलं नव्हतं का असा प्रश्न राज्यसभेचे खासदार कुमार केतकरांनी विचारला होता. या प्रश्नाचे उत्तर मात्र केंद्र सरकारच्या वतीनं देण्यात आलं नाही.
महत्वाच्या बातम्या :