पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर बंगळुरुत हाय अलर्ट, स्लीपर सेलचा संभाव्य धोका टाळण्यासाठी मोठं पाऊल
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर नवी दिल्ली आणि मुंबईनंतर देशभरातली विविध शहरांमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. बंगळुरुत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

बंगळुरु : जम्मू काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला होता. या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला तर 17 जण जखमी झाले आहेत. पुलवामा येथील 2019 नंतरचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला पहलगाममध्ये झाला. या पार्श्वभूमीवर कर्नाटकनं अंतर्गत सुरक्षा वाढवली असून पाकिस्तानातून आलेले बेकायदेशीर नागरिक आणि स्लीपर सेलचा संभाव्य धोका या पार्श्वभूमीवर निर्णय घेण्यात आला आहे.
केंद्र सरकारनं पाकिस्तानी नागरिकांना भारतात प्रवेश करण्यास मनाई केली आहे. पाकिस्तानी नागरिकांना दिलेला सार्क व्हिसा रद्द करण्यात आला आहे. कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी जे बेकायदेशीरपणे किंवा कोणत्याही वैध कागदपत्रांशिवाय राज्यात असतील त्यांना शोधून देशाबाहेर पाठवलं जाईल असं म्हटलं.
केंद्र सरकारनं पाकिस्तानच्या पासपोर्ट धारकांना दिलेला सार्क व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. जी परमेश्वरा यांनी ज्यांच्याकडे योग्य कागदपत्रं नसतील त्यांची कसून चौकशी केली जाईल, असं म्हटलं. एएनआयशी बोलताना ते म्हणाले की केंद्रीय गुप्तचर यंत्रणांसोबत समन्वयानं काम करत आहोत. कर्नाटकात विशेषत: बंगळुरुत एखादा पाकिस्तानी नागरिक सापडल्यास त्याला ताब्यात घेऊन पाकच्या उच्चायुक्ताकडे सोपवण्यात येईल.
कर्नाटकच्या पोलिसांनी बेकायदेशीर किंवा अवैधपणे राज्यात राहणाऱ्या पडताळणीसाठी किंवा शोधण्यासाठी पथकं स्थापन करण्यात आली आहे. या पथकांकडून लॉज, गेस्ट हाऊस किंवा वस्त्यांमध्ये शोध घेतला जाईल. सीबीआय आणि आयबीच्या अधिकाऱ्यांना देखील स्थानिक पोलीस स्टेशनला भेटी देण्यासंदर्भात आदेश दिले गेले आहेत. संभाव्य स्लीपर सेलच्या हालचाली किंवा कारवाया रोखण्यासाठी सीबीआय आणि आयबीची मदत घेण्याचा कर्नाटक सरकारचा प्रयत्न आहे.
परमेश्वरा यांनी नुकत्याच पार पडलेल्या कर्नाटक विधानसभेच्या अधिवेशनात 137 बेकायदेशीर नागरिकांना पकडल्याची माहिती दिली होती.त्यापैकी 25 जण पाकिस्तानी होते. 137 पैकी 84 जणांना बंगळुरुतून ताब्यात घेण्यात आलंहोतं.
बंगळुरुत यापूर्वी चर्च स्ट्रीट (2014), चिन्नास्वामी स्टेडियम (2010) मध्ये हल्ला झाला होता, हा दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. गुप्तचर विभागाच्या एका गोपनीय माहितीनुसार बंगळुरुच्या बाहेरील भागात असलेल्या जिगानी औद्योगिक पट्ट्यात छापेमारी केली होती. त्यावेळी एका पाकिस्तानी व्यक्तीला आणि इतर तीन जणांना बनावट कागदपत्रांच्या आधारे राहणाऱ्या तीन जणांना अटक केली होती. प्राथमिक तपासात बनावट पासपोर्ट आणि ओळखपत्र तयार करणाऱ्या मोठ्या गोपनीय नेटवर्कशी संबंध असल्याचं समोर आलं होतं. तपासयंत्रणांच्या इशाऱ्यानुसार स्लीपर सेल काही महिने आणि काही वर्ष निष्क्रिय असतात.
कर्नाटक सरकारनं पाकिस्तानी नागरिकांना शोधण्यासाठी कठोर पावलं उचलली आहेत. छुप्या स्लीपर सेलच्या कारवाया रोखण्यासाठी कठोर पावलं उचलण्याचं आव्हान कर्नाटक पोलिसांसमोर असेल. कारण बंगळुरु हे भारतातील इनोवेशन हब आहे.























