(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ऑक्सिजन वाहतूक करणाऱ्या टँकरचा पुणे बंगळुरु महामार्गावर अपघात, सुदैवाने प्राणहानी टळली
बेळगावला ऑक्सिजन घेवून येणाऱ्या टँकरचा पुणे बंगलोर महामार्गावरील यत्नाळ गावाजवळ शुक्रवारी पहाटे अपघात झाला. बळारी येथून ऑक्सिजन भरून घेवून टँकर बेळगावला येत होता.
बेळगाव: बेळगावला ऑक्सिजन घेवून येणाऱ्या टँकरचा पुणे बंगळुरु महामार्गावरील यत्नाळ गावाजवळ शुक्रवारी पहाटे अपघात झाला. बळारी येथून ऑक्सिजन भरून घेवून टँकर बेळगावला येत होता. यत्नाळ गावाजवळ दुसऱ्या एका वाहनाला ऑक्सिजन भरलेला टँकर ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असताना अपघात घडला. ओव्हरटेक करताना ऑक्सिजन टँकर समोरील वाहनाला धडकून समोरील टायर फुटला आणि टँकरचे एक्सल तुटले.
केवळ सुदैवाने अपघातात कोणतीही प्राणहानी झाली नाही. ऑक्सिजन टँकरला देखील अपघातामुळे कोणताही धक्का पोहोचला नाही. अपघाताची माहिती मिळताच हिरेबागेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून ऑक्सिजन टँकर रस्त्याच्या बाजूला हलवला. सध्या कोरोना साथीमुळे सगळीकडे ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणाहून ऑक्सिजनची वाहतूक करण्यात येत आहे. दोन दिवसापूर्वीच मुंबईहून कोल्हापूरला ऑक्सिजन घेवून निघालेली ऑक्सिजन टँकरला अपघात होवून ऑक्सिजन गळती झाली होती. सुदैवाने यत्नाळ गावाजवळ झालेल्या अपघातात ऑक्सिजन टँकरला धक्का लागला नाही.