Corona Vaccine | लहान मुलांना कोरोना लस देण्याची गरज नाही: नीती आयोग
Corona Vaccine | ब्रिटनमध्ये सापडलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनला घाबरण्याचं कारण नसल्याचं मत नीती आयोगाच्या सदस्यानी व्यक्त केलं आहे. तसेच लहान मुलांमध्ये लसीकरणाची गरज नसल्याचंही नीती आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलंय.

नवी दिल्ली: कोरोनाच्या लसीच्या आपत्कालीन वापराला ब्रिटन, अमेरिका आणि कॅनडासोबत अनेक देशांनी मंजुरी दिली आहे. भारतातही येत्या काही दिवसात कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. कोरोनाचे लसीकरण कशा पध्दतीनं करायचं याचं नियोजन सरकारच्या पातळीवर करण्यात आलं असून त्यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांना आणि कोरोनासंबंधी इतर सेवा बजावणाऱ्यांना प्राथमिकता देण्यात येणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय.
कोरोनाची लस लहान मुलांना द्यायची की नाही याबाबत गेले काही दिवस संभ्रम असताना आता नीती आयोगाने ही संभ्रमता दूर केली आहे. लहान मुलांना कोरोनाची लस देण्याची गरज नाही असं नीती आयोगाकडून सांगण्यात आलंय. नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही.के.पॉल यांनी म्हटलं आहे की, "आतापर्यंत हाती आलेल्या संशोधनातून स्पष्ट होतंय की लहान मुलांना कोरोनाची लस देण्याची गरज नाही."
वार्ताहारांशी संवाद साधताना डॉ.व्ही.के. पॉल म्हणाले की, "ब्रिटनमध्ये सापडलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे कोरोनाच्या लस संशोधनावर कोणताही परिणाम होणार नाही. या नव्या स्ट्रेनला घाबरण्याची काही गरज नाही. परंतु नागरिकांनी सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. संघटीत प्रयत्नांमुळे कोरोनाच्या या नव्या स्ट्रेनवर नियंत्रण प्रस्थापित करता येऊ शकतं."
कोरोनाच्या या नव्या रुपाचा विचार करुन उपचार पध्दतीमध्ये अद्याप कोणताही बदल करण्यात आला नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. तसेच देशात विकसित करण्यात येत असलेल्या लसींवर याचा कोणताही परिणाम होणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं.
डॉ.व्ही.के. पॉल पुढे म्हणाले की, "स्वरुपात बदल झालेला कोरोना ज्यादा संक्रमक असू शकतो. याबाबत असं सांगण्यात येतंय की हा नवा स्ट्रेन मूळच्या कोरोना व्हायसर पेक्षा 70 टक्के अधिक प्रभावी आहे. एका पध्दतीने विचार केला तर हा 'सुपर स्प्रेडर्स' आहे. परंतु यामुळे मृत्यूच्या संख्येत वाढ होणार नाही. फक्त याचा प्रसार जास्त वेगाने होतो हा चिंतेचा विषय आहे. या नव्या व्हायरसचा शोध लावण्याचं काम सुरु आहे."
महत्वाच्या बातम्या:
- कोरोनाची नवीन प्रजाती खरंच धोकादायक आहे का?
- Coronavirus | लंडनमधून भारतात आलेले एअर इंडियाचे 9 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह, मुंबईत उतरलेले प्रवासी क्वॉरंटाईन
- कोरोनाच्या नव्या स्ट्रेनसंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केली नवी नियमावली, 'असे' असतील नियम
- नवीन कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणांनी सावध राहून चाचण्यांचे प्रमाण वाढवावे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
