कोरोनाची नवीन प्रजाती खरंच धोकादायक आहे का?
नवीन प्रजातीचे रुग्ण केवळ एकट्या ब्रिटनमध्ये आढळत नसून ते ऑस्ट्रेलिया, डेन्मार्क, नेदरलँड या भागातही या नवीन विषाणूच्या प्रजातीचे रुग्ण आढळत आहे. सध्या नवीन प्रजाती आढळली आहे. त्याबाबत अधिक संशोधन सुरु आहे.
मुंबई : ब्रिटनमध्ये कोरोनाची नवीन प्रजाती आढळल्याचे कळताच भारतातील आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनाचे अन्य विभाग सतर्क झाले असून त्याविरोधात प्रतिबंधात्मक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. आरोग्य यंत्रणेला कोणताही धोका पत्करायचा नसल्यामुळे ही पावले उचलल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राने रात्रीची संचारबंदी जाहीर केली आहे. एकाच दिवशी 33 हजार रुग्णांना या नवीन विषाणूचा धोका झाला असून 30 नागरिकांचा यामध्ये मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या अदयाप तरी भारतात या नवीन प्रजातीचा कुठलाही रुग्ण आढळला नसला तरी सुरक्षिततेच्या दृष्टीने राज्यातील आरोग्य यंत्रांना सज्ज झाली आहे. कोरोनाची ही प्रजाती किती धोकादायक आहे? यावर सध्या तरी जी माहिती मिळत आहे त्यावरून हा निश्चितपणे घातक नाही, मात्र त्याचा प्रादुर्भाव झपाट्याने होतो असे या विषयातील डॉक्टरांनी मत व्यक्त केले आहे.
या नवीन प्रजातीचे रुग्ण केवळ एकट्या ब्रिटनमध्ये आढळत नसून ते ऑस्ट्रेलिया, डेन्मार्क, नेदरलँड या भागातही या नवीन विषाणूच्या प्रजातीचे रुग्ण आढळत आहे. सध्या नवीन प्रजाती आढळली आहे. त्याबाबत अधिक संशोधन सुरु आहे. ब्रिटनने ज्या प्रजातीची माहिती जागतिक आरोग्य संघटनेला दिली आहे, त्या प्रजातीला त्यांनी (व्ही यू आय) - 20212/01 अशा पद्धतीने संबोधिले आहे. विशेष म्हणजे या नवीन प्रजातीच्या विरोधातील कोणतीही नवीन उपचार पद्धती आहे तेच उपचार या नवीन विषाणूच्या विरोधात चालणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
याप्रकरणी मुंबई शहराच्या कोरोना मृत्यू विश्लेषण समितीचे अध्यक्ष डॉ. अविनाश सुपे सांगतात, की, "आपल्या केंद्र सरकारने तातडीने पावले उचलली असून ते खरोखरच स्वागतार्ह आहे. अशा पद्धतीने तात्काळ प्रतिबंधात्मक पावलं उचलल्याने या नवीन विषाणूच्या प्रजातीला वेळेतच अटकाव करण्यास नक्कीच मदत होणार आहे. जे काही सध्या वाचनात आले आहे त्यानुसार हा नवीन विषाणू घातक नाही त्यांच्यामुळे जास्त मृत्यू होतील असे तर अजिबात नाही. मात्र एक आहे त्याचा प्रसार फार वेगाने होतो त्यामुळे प्रादुर्भाव वाढेल. कोणत्याही साथीच्या आजारात विषाणूच्या अशा पद्धतीने जनुकीय बदल होत असतात. त्यामुळे ह्यामध्ये नवल असे काही मानायचे कारण नाही. स्वाईन फ्लू आजही आपल्याकडे सापडतो त्याच्यामध्येही अनेक जनुकीय बदल झाले आहेत. त्यामुळे लोकांनी न घाबरता काळजी मात्र घेतलीच पाहिजे. विशेष म्हणजे आपल्याकडे जी लस विकसित झाली आहे ती या नवीन प्रजाती विरोधातही उत्तम काम करत असल्याचे सांगण्यात आले आहे.
तर परळ येथील ग्लोबल हॉस्पिटल येथील श्वसन विकार तज्ज्ञ डॉ. समीर गार्डे यांच्या मते, लोकांनी प्रथमतः कोणतेही कारण नाही. मला जी माहिती मिळाली आहे त्यानुसार या व्हायरसचा प्रसार वेगाने होत असला तरी त्याची तीव्रता अधिक नाही. आपल्याला जरी हा व्हायरस बाबतची माहिती आज कळली असली तरी तो सप्टेंबर पासून त्या ठिकाणी आहे. या इतक्या मोठया कालावधीत आपल्याकडे तसा काही फारसा फरक पडलेला नाही. त्यामुळे मला वाटत नाही फार काही बदल या नवीन व्हायरस मुळे होतील . मात्र आपल्याला सगळ्या नियमांचे निश्चितच पालन करावे लागेल. या नवीन विषाणू बद्दल अजून अधिक माहिती उपलब्ध होणे अपेक्षित आहे त्यामुळे आताच काही तर्क मांडण्यात अर्थ नाही. मात्र लोकांनी काळजी घेत राहिली पाहिजे."
एकंदरच सगळ्याच डॉक्टरांच्या मतांवरून हा व्हायरस अधिक घातक नसला तरी वेगाने पसरतो म्हणून सर्व नागरिकांनी दक्षता घेतलीच पाहिजे. लीलावती रुग्णालयाचे डॉ. जलील पारकर सांगतात की, "हा नवीन विषाणू वेगाने पसरतो मात्र त्याची तीव्रता अधिक नाही. यामुळे प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होऊ शकतो त्यामुळे लोकांनी जास्त सतर्क राहणे गरजेचे आहे. शासनाने सुरक्षिततेचे जे आहेत ते नागरिकांच्या हिताचे आहेत . त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता नवीन जीवन शैलीचा अवलंब करत आपला वावर ठेवावा.