NIA Raid : देशभरातील गँगस्टर्सच्या अड्ड्यांवर NIA कडून छापेमारी; ISI-खालिस्तानी दहशतवादी कनेक्शनचा तपास
NIA Raid : देशभरात सकाळपासूनच एनआयएकडून कारवायांचा सपाटा लावण्यात आला आहे. देशभरातील काही कुख्यात गँगस्टर्सच्या अड्ड्यांवर NIA कडून छापेमारी करण्यात आली आहे.
NIA Raid : एनआयएच्या (NIA) पथकानं मंगळवारी देशभरात कारवायांचा सपाटा लावला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, देशभरात अनेक ठिकाणी एनआयएकडून छापेमारी करण्यात आली आहे. एनआयएची ही कारवाई देशातील काही गँगस्टर्सच्या (Gangsters) अड्ड्यांवर करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, काही दिवसांपासून सुरु असलेल्या चौकशीमध्ये पंजाबचे गँगस्टर्स ISI आणि खलिस्तानी दहशतवाद्यांशी असलेले संबंध समोर आले होते. त्यानंतर मोठी पावलं उचलत एनआयएनं देशभरातील अड्ड्यांवर छापेमारी करण्यास सुरुवात केली होती.
पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणात (Sidhu Moose Wala Murder) दहशतवादी अँगल असल्याचं तपासात उघड झालं आहे. स्वतः पंजाबच्या (Punjab) डीजीपींनी यासंदर्भात माहिती दिली होती. ते म्हणाले होते की, या प्रकरणात गँगस्टर्स आणि पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयचं (ISI) कनेक्शन असल्याचं समोर आलं आहे. दरम्यान, लॉरेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi) आणि गोल्डी बरार (Goldy Brar) संदीप उर्फ काला जठेडीचं दहशतवादी कनेक्शन समोर आलं आहे. त्यांनी सांगितलं की, बॉलीवूड (Bollywood) अभिनेता सलमान खान (Salman Khan) देखील मुसेवाला हत्या प्रकरणात सहभागी असलेल्या लॉरेन्स बिश्नोई गँगच्या निशाण्यावर होता. डीजीपींनी दिलेल्या माहितीनुसार, लॉरेन्स बिश्नोईच्या सांगण्यावरून आरोपी दीपकसह त्याच्या इतर साथीदारांनी सलमान खानची रेकी केली होती.
National Investigation Agency (NIA) raids are underway at various places in Delhi-NCR, Haryana and Punjab in connection with suspected terror gangs linked to the killing of Punjabi singer Sidhu Moose Wala
— ANI (@ANI) September 12, 2022
Visuals from Tajpur village in Delhi pic.twitter.com/Rrb6YHIKd0
गँगस्टर्सचे ISI आणि खलिस्तान्यांशी संबंध
काही प्रकरणांमध्ये चौकशी दरम्यान, खासकरुन पंजाबच्या गँगस्टर्सचा ISI आणि खलिस्तानी दहशतवाद्यांशी संबंध असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर NIAनं तपासाच्या सुया आवळल्या. NIA ने नीरज बवाना, लॉरेंस बिश्नोई आणि टिल्लु ताजपुरिया यांच्यासह 10 गँगस्टर्सची यादी तयार केली होती. आता या गँगस्टर्सच्या ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली आहे.
23 जण अटकेत
पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणात आतापर्यंत 23 जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच, याप्रकरणात एकूण 35 जणांची नावं समोर आली आहे. तर चकमकीत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. डीजीपींनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीच्या चौकशीत कपिल पंडितलाही लॉरेंस बिश्नोईनं सलमान खानलाही टार्गेट करण्यास सांगितल्याचं उघड झालं होतं.
सलमान खानची केली रेकी
आरोपी कपिल पंडितनं पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तो आणि त्याच्या दोन साथीदारांनी मुंबईला जाऊन रेकी केली होती. डिजीपींनी खुलासा केला आहे की, "या हत्या प्रकरणात सहभागी असलेल्या गँगस्टर्सचं आयएसआयसोबत कनेक्शन होतं. त्यानंतर एनआयएनं अॅक्शन घेत गँगस्टर्सच्या ठिकाणांवर छापेमारी केली आहे. एनआयएची ही छापेमारी देशभरातील अनेक ठिकाणी करण्यात आली.