Monsoon Update : मान्सूनचा परतीचा प्रवास लांबला, सप्टेंबर महिन्यातही जोरदार पाऊस; IMD ने वर्तवला सुधारीत अंदाज
सप्टेंबर महिन्यात देशात चांगला पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं (India Meteorological Department) वर्तवला आहे.
Monsoon Update : सध्या देशाच्या विविध भागात जोरदार पाऊस (Rain) पडत आहे. तर काही ठिकाणी पावसाळा सुरु होऊन तीन महिने झाले तरी अद्यापही चांगल्या पावसाची प्रतिक्षा कायम आहे. दरम्यान, सप्टेंबर महिन्यात देशात चांगला पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं (India Meteorological Department) वर्तवला आहे. त्यामुळं मान्सून यावर्षी देखील लवकर परतीचा प्रवास करणार नसल्याची माहिती भारतीय हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा ( Mrutyunjay Mohapatra) यांनी दिली. नैऋत्य मान्सून लवकर माघार परतीचा प्रवास करणार असल्याचा मागील आठवड्यातील अंदाज महापात्रा यांनी फेटाळून लावला आहे. या महिन्यात पावसाचा जोर अधिक राहण्याचा अंदाज त्यांनी वर्तवलाय.
मान्सूनच्या लवकर परतीसाठी अनुकूल परिस्थिती नाही
नैऋत्य मान्सून लवकर माघार घेण्याची आम्हाला अपेक्षा होती. मात्र, पश्चिम-मध्य आणि लगतच्या उत्तर-पश्चिम बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळ 7 सप्टेंबरच्या सुमारास मान्सूनचा प्रवाह दक्षिणेकडे हलवेल. त्यामुळं मध्य आणि उत्तर भारतात पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती मृत्युंजय महापात्रा यांनी दिली. त्यामुळं मान्सून लवकर माघारीसाठी परिस्थिती अनुकूल नसल्याचे महापात्रा यांनी सांगितले. हवामान विभाग परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे. 25 ऑगस्ट रोजी हवामान खात्यानं 17 सप्टेंबरच्या सामान्य तारखेपूर्वी नैऋत्य मान्सून लवकर माघार घेण्याचा अंदाज वर्तवला होता.
यावर्षी देशात सरासरीपेक्षा सहा टक्के अधिक पाऊस : हवामान विभाग
दरम्यान, या वर्षीच्या भारतात सरासरीपेक्षा सहा टक्के अधिक पाऊस झाला असल्याची माहिती देखील भारतीय हवामान विभागानं दिली आहे. परंतू उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, मणिपूर, त्रिपुरा आणि पश्चिम बंगालच्या अनेक भागांमध्ये कमी पाऊस झाला आहे. त्यामुळं या ठिकाणी खरीप हंगामातील भात पिकावर परिणाम झाला आहे. सप्टेंबरमधील पावसाच्या अपेक्षित वाढीमुळं पश्चिम आणि दक्षिण उत्तर प्रदेश आणि बिहारच्या काही भागांमध्ये कमी पावसाची भरपाई करण्यात मदत होईल, असेही हवामान विभागाने म्हटले आहे. यावर्षी संपूर्ण देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. ईशान्य भारतातील काही भाग आणि वायव्य भारतातील काही भाग वगळता भारताच्या बहुतांश भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. तिथे सामान्यपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. देशातील बहुतांश भागात दिवसाचे तापमान सामान्यपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, मध्य आणि वायव्य भारताच्या काही भागात कमाल तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: