एक्स्प्लोर
दिल्लीत मराठा एकवटले, महाराष्ट्र सदनात मराठा मोर्चा
महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांना समर्थन देण्यासाठी दिल्लीच्या कानाकोपर्यातले मराठा बांधव एकत्र झाले होते. आंदोलन हिंसेच्या नव्हे तर सामोपचाराच्या मार्गाने व्हावं, पण सरकारने आता आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करू नये, अशी प्रतिक्रिया आंदोलकांनी दिली.
नवी दिल्ली: मराठा आंदोलनाचा गजर आता राजधानी दिल्लीतही होणार आहे. कारण महाराष्ट्रातील मराठा आंदोलनाला समर्थन म्हणून आज राजधानी दिल्लीमध्ये ही मोर्चा काढण्यात आला. सकल मराठा समाजाच्या वतीने महाराष्ट्र सदनामध्ये हा मोर्चा निघाला.
महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांना समर्थन देण्यासाठी दिल्लीच्या कानाकोपर्यातले मराठा बांधव एकत्र झाले होते. आंदोलन हिंसेच्या नव्हे तर सामोपचाराच्या मार्गाने व्हावं, पण सरकारने आता आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करू नये, अशी प्रतिक्रिया आंदोलकांनी दिली.
दरम्यान, आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी खासदार संभाजीराजे ही उपस्थित होते.
महाराष्ट्रात आजही आंदोलने
आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा संघटनांकडून आजही आंदोलनं करण्यात येत आहेत. कोकणातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात मराठा समाजाच्या आरक्षणासाठी कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत.. मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मुंबई-गोवा महामार्ग कुडाळ येथे रोखून धरला.. मोठ्या संख्येनं कार्यकर्ते या रस्तारोकोमध्ये सहभागी झालेत. यावेळी कार्यकर्त्यांनी भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजीदेखील केली..
येवल्यात बंद
इकडे नाशिक जिल्ह्यातील येवल्यातही मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आज बंद पुकारण्यात आला आहे... यावेळी मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी येवला शहरातून रॅली काढली. शिवाय शहरातल्या विंचुर चौफुली येथे रस्ता रोको आंदोलन सुरु केलं...तर मनमाड-शिर्डी मार्गावरही कार्यकर्त्यांचा रस्तारोको सुरु आहे.
तिकडे सटाणा तालुक्यातील लोहणेर येथे गिरणा नदीत 6 कार्यकर्त्यांनी जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेत सहाही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय.
बार्शीत बंद
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज सकाळपासून बंद पाळला जातोय. बार्शीतल्या पानगावात मराठा आंदोलकांनी गावातच निषेध मोर्चा काढला आणि गाड्यांचे टायर जाळून आपला रोष व्यक्त केला.
सांगलीत एसटी पेटवली
मराठा समाजाच्या आरक्षण मागणीसाठी सांगलीत कार्यकर्ते आक्रमक झाले. शिराळा तालुक्यातील मांगले गावात आंदोलकांनी एसटी पेटवली. पेटवलेली एसटी वारणानगर-शिराळा मार्गावरील आहे.
9 ऑगस्टला मुंबईत मोर्चा?
मराठा क्रांती मोर्चाकडून 9 ऑगस्ट रोजी मुंबईसह राज्यात मोठं आंदोलन करण्याची तयारी सुरु आहे. यासंबंधी राज्यात लवकरच मराठा संघटनांची बैठक होणार आहे. या बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे. मागील वर्षी 9 ऑगस्ट रोजीच मुंबईत मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या पार्श्वभूमीवर ही बैठक होणार आहे.
मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलवली
मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकार पातळीवर हालाचाली सुरु झाल्या आहेत. आज मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्र्यांसोबत बैठक बोलावली आहे. रात्री 9 वाजता मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी ही बैठक होईल. बैठकीत आंदोलनाच्या सद्यस्थितीचा आढावा मुख्यमंत्री मंत्र्यांकडून घेणार आहेत. दिवसेंदिवस मराठा आंदोलन चिघळत असल्यामुळे त्यावर या बैठकीत काही तोडगा निघतो का , हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
सांगली दौरा लांबणीवर
मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगली दौरा लांबणीवर टाकला. सांगली महापालिकेच्या प्रचार सभेसाठी मुख्यमंत्री उद्या सांगली दौऱ्यावर जाणार होते. महापालिका प्रचारासाठी ते दोन सभाही घेणार होते. तसंच वाळवा तालुक्यातील आष्टा गावातील तहसिल कार्यालयाचं उद्घाटनही त्यांच्या हस्ते होणार होतं. मात्र मराठा मोर्चा आंदोलन आक्रमक झाल्यानं त्यांनी हा दौरा पुढे ढकलला आहे.
अपक्ष आमदारांचा इशारा
मुख्यमंत्री बदलले तर भाजपचा पाठिंबा काढून घेऊ असा निर्धार राज्यातल्या सहा अपक्ष आमदारांनी व्यक्त केलाय. मुख्यमंत्री मराठा आरक्षण देण्यासाठी सक्षम आहेत, मात्र त्यांना पदावरुन दूर केलं तर आपण सरकारमध्ये राहणार नाही, असा इशारा अमरावतीच्या बडनेरातील अपक्ष आमदार रवी राणा यांनी दिला आहे. अपक्ष आमदारांमध्ये त्यांच्यासोबत गणपतराव गायकवाड, हिरालाल चौधरी, किशनराव जाधव, माधवराव फड यांचाही सहभाग असल्याचा राणा यांनी म्हटलं आहे.
मराठा आरक्षणासाठी आमदारांचे राजीनामे
मराठा आरक्षणासाठी अध्यादेश काढण्याच्या मागणीसाठी कन्नडचे शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आपला राजीनामा दिला आहे. जाधव यांनी विधानसभा अध्यक्षांकडे ई-मेलद्वार राजीनामा पाठवला. विशेष म्हणजे आमदार हर्षवर्धन जाधव हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे जावई आहेत.
दुसरीकडे औरंगाबादेतील वैजापूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांनीही मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राजीनामा दिला.
छावा संघटना मागासवर्गीय आयोगाच्या भेटीला
छावा संघटनेचे अध्यक्ष गंगाधर काळकुटे यांनी मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची भेट घेतली. सामाजिकदृष्ट्या मराठा समाजाला तातडीने आरक्षण मिळावे यासाठी आयोगाने पावले उचलावीत असं निवेदन त्यांनी आयोगाचे सचिव अजय कुमार यांना संघटनेच्या वतीनं दिलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement