Manipur Violence: मणिपूरमधल्या दोन महिलांच्या निर्वस्त्र धिंडीच्या व्हिडीओनं देशभरात खळबळ, सर्वोच्च न्यायालयापासून ते संसदेपर्यंत संतप्त पडसाद
Manipur Violence Viral Video: कोणत्याही परिस्थितीत दोषींना सोडणार नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संसदेत सांगितलं.
Manipur Violence: मणिपूरमध्ये कुकी आणि मैतई या दोन जाती समुदायांमधला संघर्ष गेल्या दोन महिन्यांपासून सुरु आहे. त्यात एका अत्यंत भयानक व्हिडीओनं पुन्हा मणिपूरच्या आगीत भर टाकली आहे. दोन महिलांची निर्वस्त्र धिंड काढणाऱ्या जमावाचा हा व्हिडीओ बुधवारपासून व्हायरल (Manipur Violence Viral Video) होत आहे. त्यावर आज देशाच्या संसदेपासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत सगळीकडे संतप्त पडसाद उमटले.
मणिपूरमध्ये कुकी आणि मैतई समुदायांमधली ही आग किती टोकाला पोहचली आहे, हा वणवा किती आतपर्यंत पसरला आहे हेच यातून दिसतं. घटना आहे 4 मे रोजीची, पण ती उघड व्हायलाही तब्बल 77 दिवस लागले. निर्वस्त्र व्हा नाहीतर जीवे मारुन टाकू असं म्हणत शेकडो जणांच्या जमावानं दोन महिलांची अशी निर्वस्त्र धिंड काढली. त्यातल्या एका मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याचाही आरोप आहे.
मणिपूरमधील ही घटना आहे 4 मे रोजीची. पण हा व्हिडीओ व्हायरल झाला बुधवारपासून. 21 जूनला गावच्या सरपंचानं याबाबत एफआयआर दाखल केली. पण त्यालाही एक महिने उलटूनही कुठे वाच्यता झाली नव्हती. आरोपींवर कारवाई होत नव्हती. अखेर या व्हिडीओनंतर संतप्त प्रतिक्रिया देशभरातून यायला लागल्या. त्यानंतर मणिपूर सरकारला जाग आली. प्रमुख आरोपीला अटक केल्याचं सांगितलं जातंय.
ही घटना इंफाळपासून 50 किमी अंतरावरच्या चुरचुंदपूरची आहे. या दोन्ही महिला कुकू समुदायाच्या आहेत. मैतई समुदायाच्या जवळपास 800 जणांच्या जमावानं या कुटुंबावर हल्लाबोल केला. त्यात या महिलेचा 19 वर्षांचा भाऊ आणि वडिलांची हत्या केली. त्यानंतर या दोन महिलांची निर्वस्त्र धिंड काढली. त्यातल्या 21 वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याचाही आरोप आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मणिपूरच्या या घटनेचे पडसाद पाहायला मिळाले.
मणिपूरबद्दल पंतप्रधान बोलत का नाहीत, सभागृहात चर्चेची मागणी मान्य का होत नाही असा विरोधकांचा सवाल आहे. त्यात आज अधिवेशनाआधी माध्यमांशी बोलताना पंतप्रधान मोदींनी मणिपूरबद्दल आपलं मौन सोडलं. दोषींना कुठल्याही स्थितीत सोडणार नाही असं वक्तव्य केलं.
मणिपूरमध्ये कुकी आणि मैतई समुदायतला हा वणवा गेल्या दोन महिन्यांपासून पेटला आहे. 29 मे रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी मणिपूरचा दौरा केला. त्यानंतरही मणिपूरची आग शांत होत नाही. आता हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पुन्हा मणिपूरमधला तणाव वाढलाय. सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
सुप्रीम कोर्टानंही मणिपूरमधल्या व्हिडीओची आज स्वत:हून दखल देत (Supreme Court On Manipur Violence) सरकारचे कान उपटलेत. मणिपूरमधली ही घटना सहन करण्यापलीकडची आहे. आम्हाला ही दृश्यं पाहून धक्का बसला असं मत सुप्रीम कोर्टानं व्यक्त केलं. राज्य सरकारकडून तातडीनं रिपोर्टही मागवले आहेत. 28 तारखेला याबाबत सुनावणीही ठेवलीय. सरकारनंही कारवाई केली नाही तर आम्हाल दखल द्यावी लागेलअशी तंबीही सुप्रीम कोर्टानं दिलीय. इतकं दिवस पेटणारं मणिपूर आता कधी शांत होणार हाच प्रश्न आहे.
ही बातमी वाचा: