मणिपूरमधील महिलांची विवस्त्र धिंड काढल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी, पंतप्रधान मोदींना देखील विरोधकांचा सवाल
Manipur Violence: काँग्रेस, आप आणि टीएमसी यांसारख्या विविध राजकीय पक्षांनी या घटनेचा निषेध केला आहे. तसेच सरकारला देखील अनेक सवाल विचारले आहे.
Manipur Violence: मणिपूरमध्ये (Manipur) दोन महिलांची विवस्त्र धिंड काढल्याच्या लज्जास्पद घटनेनंतर विरोधक आता हा मुद्दा संसदेत (Parliament) उपस्थित करण्याच्या तयारी आहेत. तसेच विरोधकांनी या घटनेवर संतप्त प्रतिक्रिया देत सरकारवर ताशेरे ओढले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मौनावर देखील विरोधकांनी प्रश्न विचारले आहेत. संसदेच्या अधिवेशात या मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये घमासान होणार असल्याच्या चर्चा आता जोर धरत आहेत.
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी या घटनेचा तीव्र निषेध करत ही घटना अमानवीय असल्याचं म्हटलं आहे. तसेच त्यांनी या मुद्द्यावर मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्याशी देखील चर्चा केल्याची माहिती त्यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी या घटनेवर तात्काळ कारवाई करण्याचं आश्वासन दिलं असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे.
विरोधी पक्षाचा सरकारवर निशाणा
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी तीव्र शब्दामध्ये सरकारवर टीका केली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, "मणिपूरमध्ये भारताच्या तत्वांवर हल्ला होत असताना विरोधी पक्षांची एकजूट असलेला इंडिया आता गप्प बसणार नाही." तर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वड्रा यांनी देखील या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. यावर बोलताना त्यांनी म्हटलं की, "समाजात होणाऱ्या हिंसेमध्ये सर्वात जास्त बळी हा महिलांचा जातो." त्यांनी सरकारवर सवाल उपस्थित करत म्हटलं आहे की, "पंतप्रधान मोदी मणिपूरच्या घटनेवर डोळे बंद करुन का बसले आहेत."
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देखील ट्वीट करत या घटनेचा निषेध केला आहे. त्यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याचा मुद्दा उपस्थित करत सरकारवर निशाणा साधला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
या घटनेनंतर मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांच्या राजीनाम्याची मागणी देखील जोर धरत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेवर सरकार आणि विरोधक दोन्ही नाराज असल्याने मुख्यमंत्री बिरेन सिंह यांचा राजीनामा मागण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी देखील या घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त करत कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून मणिपूरमध्ये हिंसाचार सुरु असल्याने मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. पण तेव्हा त्यांच्या समर्थकांनी त्यांना राजीनामा देण्यापासून थांबवले होते. पण पुन्हा एकदा या घटनेमुळे मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे.
हे ही वाचा :
Manipur Violence: दोन महिलांची विवस्त्र धिंड, सामूहिक अत्याचार; मणिपूरमधील घटनेने देश हादरला!