(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Supreme Court On Manipur Violence : 'जर सरकारने निर्णय घेतला नाही तर आम्ही घेऊ', मणिपूरच्या घटनेवर सर्वोच्च न्यायालयाची ताकीद
Supreme Court On Manipur Violence : सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी मणिपूरमधील घटनेवर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश सरकाराला दिले आहेत.
Supreme Court On Manipur Violence : मणिपूरमध्ये (Manipur) महिलांची विवस्त्र धिंड काढल्याच्या व्हिडिओमुळे देशात एकच खळबळ माजली आहे. संपूर्ण देशभरातून या घटनेवर संतप्त प्रतिक्रया उमटत आहेत. या प्रकरणात आता सर्वोच्च न्यायालयाने (Spureme Court) कठोर शब्दात ताकीद दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने यावर बोलताना म्हटलं की, "जर यावर सरकारने कठोर कारवाई केली नाही तर यावर आम्ही निर्णय घेऊ." मणिपूरमधील महिलांची विवस्त्र धिंड काढल्याचा व्हिडीओ हा अत्यंत त्रासदायक आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी सरकारला या घटनेवर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. अशा पद्धतीच्या घटनांमुळे संविधानाच्या अधिकारांची पायमल्ली आहे असं देखील सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.
सरन्यायाधीशांची विशेष टिप्पणी
या घटनेवर सर्वेच्च न्यायालयाने कारवाईचे निर्देश देत राज्य सरकारला अहवाल देखील सादर करण्यास सांगितले आहे. तसेच या प्रकरणी पुढील आठवड्यात शुक्रवारी सुनावणी होणार असल्याची माहिती सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे. या प्रकरणात सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी म्हटलं की, हिंसाचार सुरु असणाऱ्या क्षेत्रामध्ये महिलांचा वापर एखाद्या वस्तूसारखा केला जात आहे. तसेच या घटनेतील दोषींवर कोणत्या प्रकारची कारवाई करण्यात आली आहे या माहिती देण्याचे निर्देशही सरन्यायाधीशांनी दिले आहेत.
नेमकं काय घडलं?
मागील काही दिवसांपासून मणिपूरमध्ये हिंसाचाराचं सत्र सुरु आहे. त्यातच एका व्हिडीओमुळे मणिपूरसह संपूर्ण देशभरात एकच खळबळ माजली. दोन महिलांची भररस्त्यात विवस्त्र धिंड काढण्यात आली. त्यानंतर या महिलांवर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. मणिपूरची राजधानी इंफाळपासून 35 किमी अंतरावर असलेल्या कंगपोकपी जिल्ह्यात ही घटना घडली असल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना 4 मे रोजीची असल्याची माहिती आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया
ही घटना अत्यंत लज्जास्पद असून या घटनेमधील दोषींवर लवकरात लवकर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. तसेच या घटनेमुळे जगात भारताचं नाव खराब होत असल्याचही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री एन बिरेन यांना त्यांच्या राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था आणखी कठोर करण्याचे निर्देश दिले आहेत. आपल्या माता भगिनींच्या सुरक्षेसाठी राज्यात कठोर निर्बंध करण्याचे निर्देशही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत.
आता या प्रकराणात राज्य सरकारकडूनही कठोर भूमिका घेण्यात येत आहे. या प्रकराणातील दोषींचा शोध घेण्यात येत असून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत.