मंहत राम सुंदर दास यांचा धर्मसंसदेतून काढता पाय, कालीचरण यांच्या वक्तव्यावर नाराजी
कालीचरण महाराजांच्या वक्तव्यावर या धर्मसंसदेत सामील झालेले मंहत राम सुंदर दास यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी या धर्मसंसदेतून काढता पाय घेतला आहे.

रायपूर : रायपूर येथे आयोजीत करण्यात आलेल्या धर्मसंसदेत कालीचरण महाराज यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल अपशब्द वापरले आहेत. याचा सर्वच स्तरातून निषेध होताना दिसत आहे. अशातच कालीचरण महाराजांच्या वक्तव्यावर या धर्मसंसदेत सामील झालेले मंहत राम सुंदर दास यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच त्यांनी या धर्मसंसदेतून काढता पाय घेत, आपण यामधून बाहेर पडत असल्याचे जाहीर केले आहे. महात्मा गांधी यांनी देशासाठी काय केले नाही, त्यांना राष्ट्रपीता ही उपाधी दिली होती. त्यांच्याबद्दल अशा धर्ससंसदेच्या मंचावरुन वक्तव्य, असे म्हणत राम सुंदर दास हे मंचावरुन निघून गेले.
रायपूर येथील धर्मसंसदेत कालीचरण महाराज यांनी महात्मा गांधी यांच्याबाबत अपशब्द वापरले आहेत. मुस्लिम हे राजकारणाच्या माध्यमातून देशावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्या डोळ्यासमोरच त्यांनी 1947 मध्ये देशावर ताबा मिळवला होता. त्यांनी प्रथम इराण, इराक आणि अफगाणिस्तानवर ताबा मिळवला आहे. तसेच राजकारणाच्या माध्यमातून त्यांनी पाकिस्तान आणि बांगलादेशवरही कब्जा केला आहे. मी नथूराम गोडसे यांना सलाम करतो की त्यांनी महात्मा गांधींची हत्या केली. असे वादग्रस्त वक्तव्य कालीचरण महाराज यांनी केले आहे. कालीचरण महाराज यांनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी त्यांच्याविरोधात काँग्रेससह इतर सामाजिक संघटनांनी गुन्हा दाखल केला आहे. रायपूरमधील काँग्रेसच्या नेत्यांनी कालीचरण यांच्याविरोधात तक्रार दाखल केली असून, त्यांच्याविरोधात राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे. अशातच आता या धर्मसंसदेत सामील झालेले मंहत राम सुंदर दास यांनी नाराजी व्यक्त केलीय.
कालीचरण महाराज यांनी केलेल्या विधानानंतर आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. १९४७ सालची देशाची परिस्थिती तुम्ही आठवा, ज्यावेळी भारत स्वतंत्र झाला. त्यासाठी महात्मा गांधी यांनी काय केले नाही, असे मंहत राम सुंदर दास म्हणाले. मी आपली सर्वांची क्षमा मागतो. तुम्हाला वाईट वाटेल, पण मी या धर्मसंसदेतून स्वत: ला अलग करत असल्याचे राम सुंदर दास यांनी सांगितले.
दरम्यान, कालीचरण महाराज यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे विधीमंडळात पडसाद पडले आहेत. कालीचरण महाराज यांच्यावर कडक कारवाई करावी, त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून अटक करावी अशी मागणी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. महात्मा गांधी यांचा केलेला अपमान सहन करणार नसल्याचे मलिक म्हणाले. तर याबाबत माहिती घेऊन सक्त कारवाई करण्यात येईल असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या:
























