(Source: ECI/ABP News/ABP Majha)
धर्म संसदेतील वादग्रस्त भाषणांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल; FIR दाखल
Haridwar Dharma Sansad Sparks Outrage : धर्म संसदेतील वादग्रस्त भाषणांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यावरुन वादाला तोंड फुटलं आहे. तसेच याप्रकरणी FIR दाखल करण्यात आला आहे.
Haridwar Dharma Sansad Sparks Outrage : उत्तराखंड हरिद्वारमध्ये 17 पासून 19 डिसेंबरपर्यंत धर्म संसदेचं (Dharma Sansad) आयोजन करण्यात आलं होतं. या धर्म संसदेत साधू-संतांनी हिंदुत्वासंदर्भात केलेल्या वादग्रस्त भाषणांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या धर्म संसदेतील वक्त्यांनी कथितरित्या मुस्लिमांविरुद्ध हिंसाचाराचं समर्थन केलं आणि 'हिंदू राष्ट्रा'साठी संघर्ष पुकारण्याचं आवाहन केल्याचं सांगण्यात येतंय. माजी लष्करप्रमुख, कार्यकर्ते आदींनी या वादग्रस्त भाषणाचा तीव्र निषेध करत कारवाईची मागणी केली आहे. तृणमूल काँग्रेसचे नेते आणि आरटीआय कार्यकर्ते साकेत गोखले यांनी या प्रकरणी आयोजक आणि वक्त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. तीन दिवसांच्या या धर्म संसदेचा समारोप सोमवारी करण्यात आला होता.
धर्म संसदेचा समारोप होऊन तीन दिवस उलटून गेल्यानंतर गुरुवारी उत्तराखंड पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. दरम्यान, आतापर्यंत याप्रकरणी कोणावर कारवाई करण्यात आलेली नाही. उत्तराखंड पोलिसांनी याप्रकरणी केवळ एका आरोपीचे नाव दिले आहे.
धर्म संसद कार्यक्रमातील वक्त्यांना अशा भाषणांचा कोणताही पश्चाताप नाही. त्यापैकी बरेच जण सत्ताधारी भाजपशी संबंध असल्याचा दावाही करत असल्याची माहिती मिळत आहे. वारंवार विचारणा केल्यानंतर, अद्यापपर्यंत कोणतीही तक्रार दाखल न झाल्यानं एफआयआर नोंदवण्यात आला नसल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. हरिद्वारचे एसपी स्वतंत्र कुमार सिंह म्हणाले की, 'या प्रकरणी पोलीस परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.'
धर्म संसद या कार्यक्रमाचं आयोजन एक धार्मिक नेते यति नरसिंहानंद यांनी केलं होतं. त्यांच्यावर यापूर्वीही प्रक्षोभक भाषणांनी हिंसेला समर्थन दिल्याचा आरोप करण्यात आले आहेत. साकेत गोखले यांच्या तक्रारीनुसार, कार्यक्रमाशी संबंधित इतर लोकांमध्ये हिंदू रक्षा सेनेचे प्रबोधानंद गिरी, भाजप महिला आघाडीच्या नेत्या उदिता त्यागी आणि भाजप नेत्या अश्विनी उपाध्याय यांचा समावेश आहे, ज्यांना प्रक्षोभक भाषण प्रकरणात जामीन मिळाला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- उत्तर प्रदेश निवडणूका टळणार? अलाहाबाद हायकोर्टाच्या पंतप्रधान मोदींना सूचना
- international fake currency racket : बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश, 8 लाख बनावट नोटांसह दोघांना अटक
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा