(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कालीचरण महाराजांच्या वक्तव्याचे विधीमंडळात पडसाद, राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
महात्मा गांधी यांच्याबद्दल कालीचरण महाराजांनी केलेल्या वक्तव्याचे विधीमंडळात पडसाद पडले आहेत. त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून अटक करावी अशी मागणी मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.
मुंबई : कालीचरण महाराज यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे विधीमंडळात पडसाद पडले आहेत. कालीचरण महाराज यांच्यावर कडक कारवाई करावी, त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून अटक करावी, अशी मागणी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. महात्मा गांधी यांचा केलेला अपमान सहन करणार नसल्याचे मलिक म्हणाले. तर याबाबत माहिती घेऊन सक्त कारवाई करण्यात येईल असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
मलिक यांच्याबरोबरच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही कालीचरण महाराज यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. महात्मा गांधी यांच्याबद्दल अपशब्द वापरण्याचे पाप कालीचरण महाराज यांनी केले आहे. त्यामुळे याप्रकरणी त्यांच्याविरोधात राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी पटोले यांनी केली आहे. तर ज्यांचा संपूर्ण जगाने स्विकार केला, ज्यांनी अंगावर वस्त्र न घालता देशासाठी काम केले, अशा महामानवाबद्दल अपशब्द वापरणे चुकीचे असल्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. सभागृहाने एकमत करुन कालीचरण महाराज यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी करावी, असे वडेट्टीवार म्हणाले.
काय म्हणाले होते कालीचरण महाराज
छत्तीगडची राजधानी असलेल्या रायपूर येथे आयोजीत करण्यात आलेल्या धर्मसंसदेत कालीचरण महाराज यांनी महात्मा गांधी यांच्याबाबत अपशब्द वापरले आहेत. मुस्लिम हे राजकारणाच्या माध्यमातून देशावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्या डोळ्यासमोरच त्यांनी १९४७ मध्ये देशावर ताबा मिळवला होता. त्यांनी प्रथम इराण, इराक आणि अफगाणिस्तानवर ताबा मिळवला आहे. तसेच राजकारणाच्या माध्यमातून त्यांनी पाकिस्तान आणि बांगलादेशवरही कब्जा केला आहे. मी नथूराम गोडसे यांना सलाम करतो की त्यांनी महात्मा गांधींची हत्या केली. असे वादग्रस्त वक्तव्य कालीचरण महाराज यांनी केले आहे. कालीचरण महाराज यांनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी त्यांच्याविरोधात काँग्रेससह इतर सामाजिक संघटनांनी गुन्हा दाखल केला आहे. रायपूरमधील काँग्रेसच्या नेत्यांनी कालीचरण यांच्याविरोधात तक्रार दाखल केली असून, त्यांच्याविरोधात राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे.
सध्या देशातील वेगवेगळ्या राज्यात हिंदू धर्मसंसदेचे आयोजन करण्यात येत आहे. या धर्मसंसदेतून अनेक वादग्रस्त वक्तव्य समोर येत आहेत. अशातच आता कालीचरण महाराज यांनीही वादग्रस्त विधान करुन नव्या वादाला तोंड फोडले आहे.
महत्त्वाच्या बातम्या: