ममता दीदींच्या 'कोणती यूपीए?' वक्तव्यावर काँग्रेस आक्रमक, 'ममता भाजपची ताकत वाढवत आहेत...'
काय आहे यूपीए? यूपीए आता उरली नाही असं वक्तव्य पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलं आहे. यावरुन काँग्रेस पक्ष मात्र आक्रमक झाला असून ममता बॅनर्जी आणि भाजप एक असल्याचा आरोप केला आहे.
मुंबई : काय आहे यूपीए? यूपीए आता उरली नाही असं वक्तव्य तृणमूलच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलं आहे. विशेष म्हणजे यूपीएचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या भेटीनंतर हे वक्तव्य केल्याने सर्वांच्या भूवया उंचावल्या. येत्या निवडणुकीत ममता बॅनर्जी आणि शरद पवार एकत्र येऊन आघाडी स्थापन करणार आणि काँग्रेसला 'कात्रजचा घाट' दाखवणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात केली जात आहे. यावरुन काँग्रेस पक्ष मात्र आक्रमक झाला असून ममता बॅनर्जी आणि भाजप एक असल्याचा आरोप केला आहे.
काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी म्हटलं आहे की, ममता बनर्जी यांचं हे वक्तव्य म्हणजे वेडेपणा आहे. त्यांना असं वाटतं की, पूर्ण देश ममता-ममता करत आहे. मात्र पश्चिम बंगाल म्हणजे ममता आणि ममका म्हणजे बंगाल नाही. भाजप आणि ममता एक आहेत. मिले सुर मेरा-तुम्हारा तो सुर बने हमारा, असंच काहीसं ममता आणि भाजपचं आहे. ममतांची ताकत आज वाढली आहे कारण त्यांच्यासोबत पंतप्रधान मोदी आहेत, असा आरोप चौधरी यांनी केला आहे.
शरद पवार यांना यात का ओढलं जात आहे?
चौधरी म्हणाले की, शरद पवार यांना यात का ओढलं जात आहे काही कळत नाही. ही ममता बनर्जी यांची एक खेळी आहे. शरद पवार आणि अन्य नेत्यांना आणून असं दाखवायचं की काँग्रेस आणि यूपीएपासून एक वेगळी फोर्स तयार केली जात आहे. ममता बॅनर्जी यांच्यामुळं बीजेपीला फायदा होत आहे. त्या भाजपला ऑक्सिजन सप्लाय करत आहेत.
पैशांवरुनही केले आरोप
अधीर रंजन चौधरी यांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, टीएमसीकडे इतका पैसा कुठून आला. त्यांनी म्हटलं की, बंगाल लुटून टीएमसी बाहेरील राज्यात पैसा खर्च करत आहे आणि काँग्रेसला कमजोर करत आहे. सोबतच यामुळं मोदींना ताकत मिळत आहे. याआधी अनेक पक्षांनी असा प्रयत्न केला आहे मात्र काँग्रेस एक वाहती नदी आहे जी सतत वाहत राहिल, यूपीए अखंड आहे, असं चौधरी म्हणाले.
संबंधित बातम्या :
- Mamata Banergee : काँग्रेसला वगळून आघाडी करणार, जे लढतील त्यांना सोबत घेणार; ममता बॅनर्जींचे संकेत
- Mamata Banerjee Mumbai Visit : ममता बॅनर्जींचा 'जय मराठा, जय बांगला'चा नारा, सिद्धिविनायकाचं घेतलं दर्शन
- Mamata Banerjee Meet Swara Bhasker : स्वरा भास्करने घेतली ममता बॅनर्जींची भेट, म्हणाली...