(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mamata Banerjee : कोणती यूपीए? आता यूपीए उरली नाही; शरद पवारांच्या भेटीनंतर ममतांचा काँग्रेसला 'कात्रजचा घाट'
Mamata Banerjee : काँग्रेसला वगळून एक वेगळा पर्याय देण्याचे संकेत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिले आहेत.
मुंबई : काय आहे यूपीए? यूपीए आता उरली नाही असं वक्तव्य तृणमूलच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलं आहे. विशेष म्हणजे यूपीएचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या भेटीनंतर हे वक्तव्य केल्याने सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत. त्यामुळे येत्या निवडणुकीत ममता बॅनर्जी आणि शरद पवार एकत्र येऊन आघाडी स्थापन करणार आणि काँग्रेसला 'कात्रजचा घाट' दाखवणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात केली जात आहे.
तृणमूलच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या मुंबई भेटीवर असून त्यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तरं दिली. शरद पवारांनी यूपीएचं नेतृत्व करावं का या प्रश्नावर उत्तर देताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, "अरे काय आहे यूपीए? आता यूपीए असं काही राहिलं नाही."
जो फिल्डमध्ये राहून, तळागाळात उतरुन लढू शकतो तो स्ट्राँग विरोधक. जो लढतच नाही त्याला आम्ही काय म्हणणार? असं सांगत ममता बॅनर्जींनी एक प्रकारे काँग्रेसवर टीकाच केली आहे. ममता बँनर्जींच्या या वक्तव्यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, "ममता बॅनर्जी यांच्या मताशी मी सहमत आहे. पश्चिम बंगालमध्ये त्यांनी मिळवलेला विजय हेच दाखवतो. तळागाळात काम करणाऱ्या लाखो तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते आणि ममता लढल्या त्यामुळेच ते शक्य झाले."
यूपीए व्यतिरिक्त पर्याय देणार
भाजप विरोधात जे लढतील त्या सर्वांना एकत्र घेणार असून यूपीए व्यतिरिक्त वेगळा पर्याय देणार असल्याचं ममता बॅनर्जींनी संकेत दिले आहेत. ममता बॅनर्जींनी केंद्रातल्या भाजप सरकारला पर्याय देण्यासाठी प्रयत्न सुरु केला असून त्याचाच एक भाग म्हणून या मुंबई दौऱ्याकडे पाहिलं जातं.
दरम्यान, ममता बॅनर्जींनी मंगळवारी शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांची भेट घेतली.
संबंधित बातम्या :