PM Modi In Ujjain: महाकालेश्वर कॉरिडोअरचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन, दर्शनाला येणाऱ्या भाविकांना मिळणार जागतिक दर्जाच्या सुविधा
Mahakal temple in Ujjain: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी मध्य प्रदेशातील उज्जैन येथे महाकालेश्वर कॉरिडोअरचं उद्घाटन केलं. तत्पूर्वी पंतप्रधानांनी महाकालेश्वर मंदिरात पूजाही केली.
Mahakal temple in Ujjain: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी मध्य प्रदेशातील उज्जैन येथे महाकालेश्वर कॉरिडोअरचं उद्घाटन केलं. तत्पूर्वी पंतप्रधानांनी महाकालेश्वर मंदिरात पूजाही केली. महाकालेश्वर कॉरिडोअर प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात मंदिरात येणाऱ्या भाविकांना जागतिक दर्जाच्या आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या कार्यक्रमाला मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहानही उपस्थित होते.
या प्रकल्पाचा उद्देश संपूर्ण प्रदेशातील गर्दी कमी करणे आणि वारसा वास्तूंचे संवर्धन आणि जीर्णोद्धार यावर विशेष भर देणे आहे. या प्रकल्पांतर्गत मंदिर परिसराचा विस्तार करण्यात येणार आहे. या संपूर्ण प्रकल्पाची एकूण किंमत सुमारे 850 कोटी रुपये आहे. महाकालेश्वर कॉरिडोअरचे उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी तेथे उपस्थित लोकांना संबोधित केले.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, शंकराच्या सानिध्यात काहीही सामान्य नाही. सर्व काही अलौकिक, असाधारण, अविस्मरणीय आणि अविश्वसनीय आहे. उज्जैनची ही ऊर्जा आश्चर्यकारक आहे. महाकालेश्वरचा आशीर्वाद मिळाला की, आयुष्यातील काळ्या रेखा पुसट होतात. मी राजाधिराजा महाकालेश्वरच्या चरणी प्रणाम करतो. शिवराज सिंह यांच्या सरकारचे मी मनापासून आभार मानतो, असंही ते म्हणाले.
"उज्जैन भारताच्या आत्म्याचे केंद्र आहे"
पंतप्रधान म्हणाले की, उज्जैन हे केवळ ज्योतिषशास्त्रीय गणनेत भारताचे केंद्र राहिलेले नाही, तर ते भारताच्या आत्म्याचेही केंद्र राहिले आहे. यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी राष्ट्राने आपल्या सांस्कृतिक उंचीला स्पर्श करून आपली ओळख अभिमानाने सांगणे आवश्यक आहे. भारताचा नवा अध्याय सुरू करणाऱ्या महाराजा विक्रमादित्यचे वैभव उज्जैनने पाहिले आहे.
पंतप्रधान म्हणाले की, उज्जैनने हजारो वर्षांपासून भारताची समृद्धी, ज्ञान, प्रतिष्ठा आणि साहित्याचे नेतृत्व केले आहे. उज्जैनच्या प्रत्येक क्षणात इतिहास आहे. येथील प्रत्येक कणात अध्यात्म सामावलेले आहे आणि प्रत्येक कोपऱ्यात दैवी ऊर्जा संचारत आहे. भारत हे सांस्कृतिक तत्वज्ञान पुन्हा एकदा शिखरावर पोहोचून जगाला मार्गदर्शन करण्यासाठी सज्ज होत आहे. ते म्हणाले की, स्वातंत्र्याच्या अमृतामध्ये भारताने गुलामगिरीच्या मानसिकतेतून मुक्तता आणि आपल्या वारशाचा अभिमान असलेल्या पंचप्राणाची हाक दिली आहे. त्यामुळेच आज अयोध्येत भव्य श्री राम मंदिर उभारणीचे काम जोरात सुरू आहे. काशीतील विश्वनाथ धाम भारताच्या संस्कृतीचा अभिमान वाढवत आहे. सोमनाथमध्ये विकासकामे नवनवे विक्रम प्रस्थापित करत आहेत. उत्तराखंडमधील बाबा केदार यांच्या आशीर्वादाने केदारनाथ, बद्रीनाथ तीर्थक्षेत्रात विकासाचे नवे अध्याय लिहिले जात आहेत.