(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Lok Sabha Election 2024 : काँग्रेस आणि आपमधील जागा वाटपाचा गुंता सुटणार? दिल्लीतील बैठकीत काय झालं?
Congress AAP Meeting : काँग्रेस नेते मुकुल वासनिक यांनी ही बैठक सकारात्मक झाली असल्याची माहिती दिली. या बैठकीत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपले प्रतिनिधी पाठवले होते.
Lok Sabha Election : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर जागा वाटपाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. इंडिया आघाडीतील काँग्रेस आणि आम आदमी पक्षाच्या शिष्टमंडळात आज चर्चेची पहिली फेरी पार पडली. काँग्रेस नेते मुकुल वासनिक यांनी ही बैठक सकारात्मक झाली असल्याची माहिती दिली. या बैठकीत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपले प्रतिनिधी पाठवले होते. दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये दोन ते अडीच तास बैठक झाली. या बैठकीनंतर काँग्रेस आणि आपमधील जागा वाटपाचा तिढा सुटणार असल्याची चर्चा सुरू आहे.
या बैठकीत दिल्ली आणि पंजाबमधील जागा वाटपांबाबत चर्चा झाली. मुकुल वासनिक यांनी म्हटले की, दोन्ही पक्षांमध्ये सुरू असलेली चर्चा आगामी काळातही सुरू राहणार आहे. काही दिवसांमध्ये पुन्हा बैठक पार पडेल. पुढील बैठकीत जागा वाटपाबाबत आम्ही अंतिम स्वरुप देऊ, त्यानंतर त्याची माहिती माध्यमांना देणार असल्याचे वासनिक यांनी म्हटले. दोन्ही पक्ष हे इंडिया आघाडीतील महत्त्वाचे पक्ष असून भाजपशी दोन हात करणार असल्याचे त्यांनी म्हटले.
काँग्रेसला किती हव्यात जागा?
कोणत्या राज्यामधील जागा वाटपाबाबत चर्चा झाली, याबाबत भाष्य करणे दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी उत्तर देणे टाळले. काही दिवसांपूर्वी सूत्रांनी एबीपी न्यूजला सांगितले होते की काँग्रेस पंजाबमध्ये 6 आणि दिल्लीत 3 जागांची मागणी करत आहे. अशा स्थितीत आप आणि काँग्रेस किती जागा लढवणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. पंजाबमधील जागावाटपावरून गेल्या काही दिवसांपासून आम आदमी पक्ष आणि काँग्रेसमध्ये शाब्दिक युद्ध सुरू आहे.
'आप'चा प्रयत्न काय?
गुजरात, गोवा, मध्य प्रदेश आणि हरियाणा यांसारख्या राज्यांमध्ये आम आदमी पार्टी (आप) काँग्रेसकडेही जागा मागू शकते, असे संकेत आहेत. वास्तविक अरविंद केजरीवाल यांनी 7 जानेवारीला गुजरात दौऱ्यावर असताना एका जागेसाठी उमेदवार जाहीर केला होता. येत्या काही महिन्यांत होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत भरूच लोकसभा मतदारसंघातून आमदार चैत्रा वसावा हे आपचे उमेदवार असतील, अशी घोषणा केजरीवाल यांनी केली होती.
आजच्या बैठकीपूर्वी आपच्या सूत्रांनी सांगितले की, केवळ दिल्ली-पंजाबच नाही तर ज्या राज्यांमध्ये आम आदमी पक्षाचे प्रतिनिधी आणि संघटना आहेत त्या सर्व राज्यांशी चर्चा केली जाईल. म्हणजे गुजरात आणि गोव्याचाही यात समावेश असणार आहे.