PM Modi Speech Today: लॉकडाऊन संपला तरी कोरोनाचं संकट कायम, खबरदारी घेण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदीचं आवाहन
लॉकडाऊन संपला तरी कोरोना व्हायरस संपलेला नाही, हे आपण विसरू नये. प्रत्येक भारतीयाच्या प्रयत्नामुळे आज परिस्थिती सुधारली आहे, ती पुन्हा बिघडणार नाही याची प्रत्येकांना काळजी घेणे गरजेचं आहे.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना संकटात सातव्यांदा आज देशाला संबोधित केलं. देशात लॉकडाऊन संपलं आहे, मात्र सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे, असं आवाहन पंतप्रधान मोदींनी देशवासियांना केलं. जनता कर्फ्यूपासून आतापर्यंत कोरोनाविरूद्धच्या लढाईत आपण बरीच पुढे वाटचाल केली आहे. बहुतेक लोक आपल्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी आणि पुन्हा आयुष्याची सुरुवात करण्यासाठी दररोज घराबाहेर पडत आहेत. लॉकडाऊन संपला तरी कोरोना व्हायरस संपलेला नाही, हे आपण विसरू नये. प्रत्येक भारतीयाच्या प्रयत्नामुळे आज परिस्थिती सुधारली आहे, ती पुन्हा बिघडणार नाही याची प्रत्येकांना काळजी घेणे गरजेचं आहे.
आज देशाचा कोरोना रिकव्हरी रेट चांगला आहे, मृत्यूचे प्रमाणही दिवसेंदिवस कमी होत आहे. जगातील प्रगत संपन्न देशांच्या तुलनेत भारत अधिकाधिक नागरिकांचे प्राण वाचविण्यात यशस्वी होत आहे. कोविड साथीच्या विरूद्ध लढा वाढवण्यासाठी चाचण्यांची वाढती संख्या ही आपली मोठी ताकद आहे. आपले डॉक्टर्स, परिचारिका, आरोग्य कर्मचारी देशातील मोठ्या लोकसंख्येची नि:स्वार्थ सेवा करत आहेत. त्यांच्या या सर्व प्रयत्नांमध्ये आपण निष्काळजीपणा न करणे ही आपली जबाबदारी आहे. कोरोना निघून गेला आहे किंवा कोरोनाचा आता कोणताही धोका नाही, असं मानण्याची ही वेळ नाही.
परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत असताना अनेकजण कोरोनाचे नियम पाळता दिसत नाहीत. लोकांना खबरदारी घेणे बंद केलं हे चुकीचे आहे. तुम्ही मास्क लावत नसाल, हात वेळेच धुवत नसाल तर तुम्ही कुटुंबातील लहान मुले, वयस्कर व्यक्ती यांना संकटात टाकत आहात, असं मोदींनी सांगितलं. कोरोनाची लस येईपर्यंत आपण कोरोनाशी असलेला आपला लढा कमकुवत होऊ देऊ नये. कोरोना लस येईल तेव्हा, ती प्रत्येक भारतीयापर्यंत किती लवकर पोहोचेल याची सरकारकडून तयारीही सुरू आहे. ही लस प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचली पाहिजे, त्यासाठी काम वेगाने सुरू आहे, असंही मोदींनी सांगितलं.
सणाचा काळ आपल्या जीवनात आनंदाचा , उल्हास, उत्साहाचा काळ आहे. एक कठीण काळ मागे सारून आपण पुढे जात आहोत. थोडीशी बेपर्वाई आपला वेग मंदावू शकते. आपला आनंद हरवू शकते. आयुष्यातल्या जबाबदाऱ्या पार पाडणे , आणि सतर्कता बाळगणे या दोन्ही गोष्टी एकत्र असतील तर जीवनात आनंद राहील. सहा फुटांचे सुरक्षित अंतर, वारंवार हात साबणाने धुणे, मास्क लावणे लक्षात ठेवा, असं मोदी म्हणाले.