देशात ओमायक्रॉन बाधितांच्या संख्येत वाढ, जाणून घ्या कोणत्या राज्यात काय आहे निर्बंध!
Coronavirus Omicron restriction in India : ओमायक्रॉन बाधितांच्या बाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह इतर राज्यांनी निर्बंध लागू केले आहेत.
Coronavirus Omicron Updates India : देशात कोरोनाचा व्हेरियंट ओमायक्रॉन बाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. अनेक राज्यांनी खबरदारीचे उपाय आखण्यास सुरुवात केली आहे. भारतातील 17 राज्यांमध्ये 415 बाधिते आढळली आहेत. तर, 115 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी विविध निर्बंध जाहीर केले आहेत.
जगातील 108 देशांमध्ये या व्हेरियंटचे आतापर्यंत दीड लाखांपेक्षा अधिक रुग्ण आहेत. तर, 26 जणांचा मृत्यू झाला आहे. भारतात आतापर्यंत 17 राज्यांमध्ये आतापर्यंत ओमायक्रॉनचे 415 प्रकरणे समोर आले आहे. त्यापैकी 115 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक 108 ओमायक्रॉन बाधितांची नोंद करण्यात आली आहे. भारतात ओमायक्रॉनमुळे आतापर्यंत एकही जणाचा मृत्यू झाला नाही.
कोरोनाच्या चौथ्या लाटेचा सामना संपूर्ण जग करत असून काळजी घेण्याचे आवाहन सरकारने केले आहे. वर्षाच्या शेवटी होणारे उत्सव, कार्यक्रमांमध्ये गर्दी न करण्याचे आवाहन सरकारने केले आहे. गर्दीची ठिकाणे आणि अनावश्यक प्रवास न करण्याचे आवाहनही सरकारने केले आहे.
जाणून घ्या कोणत्या राज्यात कोणती निर्बंध :
उत्तर प्रदेश: ओमायक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेता, उत्तर प्रदेशमध्ये आजपासून रात्रीच्या वेळी संचार बंदी (कर्फ्यू) लागू होणार आहे. आजपासून म्हणजेच २५ डिसेंबरपासून रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत हा नाईट कर्फ्यू लागू असणार आहे. अत्यावश्यक सेवा आणि रुग्णवाहिका यासारख्या अत्यावश्यक वाहनांच्या वाहतुकीला परवानगी असणार आहे.
गुजरात: गुजरातमधील 8 प्रमुख शहरांमध्ये रात्रीच्या कर्फ्यूच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. या 8 शहरांमध्ये रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू असेल.
हरियाणा: हरियाणामध्येही आज रात्रीचा कर्फ्यू लागू होणार आहे. रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू असेल.
महाराष्ट्र: महाराष्ट्रात आज रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू राहणार आहे. राज्यभरात एकाच ठिकाणी ५ पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे. मुंबईतील आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी मुंबई महापालिकेने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. आता दुबईहून मुंबईत येणाऱ्यांना ७ दिवस होम क्वारंटाईनमध्ये राहावे लागणार आहे.
मध्य प्रदेश: मध्य प्रदेशातही रात्रीचा कर्फ्यू लागू आहे. उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात भस्म आरतीसाठी सर्वसामान्य भाविकांच्या प्रवेशावर पुन्हा एकदा बंदी घालण्यात आली आहे. उज्जैनच्या इतिहासात दुसऱ्यांदा भस्म आरतीमध्ये लोकांना प्रवेश बंद करण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे.
छत्तीसगड: छत्तीसगड सरकारने धार्मिक आणि सामाजिक सण आणि नवीन वर्षाच्या कार्यक्रमांमध्ये केवळ 50 टक्के लोकांनाच सहभागी होण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे.
तिरुमाला तिरुपती: तिरुमला तिरुपती देवस्थानम्स (TTD) ने सांगितले की, तिरुमला येथील भगवान व्यंकटेश्वर मंदिरात जाण्यासाठी भाविकांना संपूर्ण लसीकरण प्रमाणपत्र किंवा 48 तासांपूर्वी केलेल्या कोविड-19 चाचणी निगेटिव्ह असल्याचा अहवाल आणावा लागणार आहे.