पहाटेच्या सुमारास भीषण अपघात, 14 ठार; तीर्थयात्रेवर निघालेल्या 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू
कन्नड जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 63 वर बुधवारी 22 जानेवारी रोजी सकाळी ही दुर्घटना घडली आहे.
बेळगाव : कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यातील यल्लापूर तालुक्यात भीषण अपघाताची (Accident) घटना घडली आहे. यल्लापूर तालुक्यातील गुळ्ळापुर नजीक भाजीपाल्याने भरलेली ट्रक पलटी होऊन भीषण अपघाताची घटना घडली. या दुर्घटनेत ट्रकमधील 10 जण ठार झाले असून घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तर, दुसऱ्या दुर्घटनेत 3 विद्यार्थ्यांसमवेत 4 जणांचा मृत्यू झाल्याचीही दुर्घटना घडली. कर्नाटकच्या (Karnatak) रायपूर जिल्ह्यात ही घटना घडली. सिंधनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चारचाकी वाहन पलटी होऊन ही अपघाताची घटना घडली आहे. नरहरी मंदिरात पूजा करण्यासाठी विद्यार्थ्यांची कार हम्पीच्या तिर्थयात्रेसाठी निघालेली होती. मात्र, भीषण दुर्घटनेत कारमधील 4 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे, कर्नाटकमधील अपघाताच्या घटनेत एकूण 14 जणांचा मृ्त्यू झाला आहे.
कन्नड जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 63 वर बुधवारी 22 जानेवारी रोजी सकाळी ही दुर्घटना घडली आहे. भाजीपाल्यांनी भरलेल्या लॉरीतून 25 जण प्रवास करत होते. गुळ्ळापुरजवळील घट्टा परिसरात ही लॉरी पलटल्यानंतर लॉरीतून प्रवास करणाऱ्या 10 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर, ट्रकमधील इतर 11 जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिका व पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली असून जखमींना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर, मृत व्यक्तींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.
पहाटेच्या धुक्यामुळे अपघाताची घटना
दरम्यान पहाटेच्या सुमारास भाजीपाला घेऊन जाणाऱ्या ट्रकसोबत घट्टा परिसरात पहाटे धुक्याचे वातावरण असल्याने ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. धुक्याच्या वातावरणामुळे पुढील वाहनाचा अंदाज न आल्याने लॉरी पुढच्या वाहनाला धडकली आणि चालकाचा ट्रकवरील ताबा सुटला. त्यानंतर, बाजुच्या खड्ड्यात ट्रक पडली असल्याचे प्राथमिक माहितीनुसार सांगण्यात येत आहे. दरम्यान, अपघातातील जखमींना हुबळी किम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यल्लापूर पोलीस स्थानकाच्या पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पुढील तपास सुरू केला आहे.
मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या वारसांना मदत
दरम्यान, अपघाताच्या दोन्ही घटनांवर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी शोक व्यक्त केला असून मृतांच्या वारसांना 3 लाख रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. तसेच, जखमींना लवकरात लवकर बरे होण्यासाठी संबंधितांना सूचनाही करण्यात आल्या आहेत.
#WATCH | Karnataka | 10 died and 15 injured after a truck carrying them met with an accident early morning today. All of them were travelling to Kumta market from Savanur to sell vegetables: SP Narayana M, Karwar, Uttara Kannada
— ANI (@ANI) January 22, 2025
(Visuals from the spot) https://t.co/hJQ84aljHw pic.twitter.com/dVtNEKQna7