DK Shivakumar: उपमुख्यमंत्री नको... मुख्यमंत्रीपदच हवं; नाराज डीके शिवकुमार यांची भूमिका, काँग्रेससमोरील पेच वाढला
Karnataka Government Formation: सिद्धारमय्या यांना मुख्यमंत्रीपद आणि डीके शिवकुमार यांना उपमुख्यमंत्रीपद देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
Karnataka Government Formation: कर्नाटकात मुख्यमंत्रीपदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू असून अजूनही अंतिम निर्णय झाला नाही. सिद्धारमय्या यांचे नाव अंतिम झाल्याच्या बातम्या येत असताना आता मुख्यमंत्रीपदाचे दुसरे दावेदार असलेले डीके शिवकुमार (DK Shivakumar) नाराज असल्याची चर्चा आहे. डीके शिवकुमार हे अजूनही मुख्यमंत्रीपदासाठी अडून असल्याची बातमी आहे. त्यामुळे काँग्रेस हायकमांड अद्याप कोणत्याही निर्णयावर आलं नाही.
सिद्धारय्या यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी अंतिम झालं असून डीके शिवकुमार यांना उपमुख्यमंत्री आणि इतर महत्त्वाची सहा खाती देण्याची ऑफर असल्याची चर्चा होती. त्यानंतर आता डीके शिवकुमार यांनी मुख्यमंत्रीपदाव्यतिरिक्त कोणतंही पद नको असल्याचं कळवल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे काँग्रेस हायकमांडची डोकेदुखी वाढली असून मुख्यमंत्रीपदाचा तिढा अद्याप सुटलेला नाही.
डीके शिवकुमार हे कनकापुरा मतदारसंघातून सलग सात वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. कर्नाटकात काँग्रेसची सत्ता आणण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा आहे. काँग्रेसचा एक डॅशिंग नेता अशीच त्यांची ओळख असून भाजपला जशास तसं उत्तर देण्यात तरबेज आहेत.
कर्नाटकचा पुढील मुख्यमंत्री निवडण्यासाठी सुरू असलेल्या मंथनादरम्यान माजी मुख्यमंत्री सिद्धारमय्या आणि प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांनी आज राहुल गांधी यांची स्वतंत्रपणे भेट घेतली. सिद्धारमय्या यांनी राहुल गांधींशी सुमारे अर्धा तास चर्चा केली. तर शिवकुमार यांनी त्यांच्याशी तासाभराहून अधिक वेळ चर्चा केली. राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर शिवकुमार काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी पोहोचले. त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतरही अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डीके शिवकुमार यांना सहा खात्यांसह उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर देण्यात आली आहे. पण त्यांनी ती अद्याप स्वीकारली नाही.
कोण आहेत डीके शिवकुमार?
- कर्नाटक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष.
- काँग्रेसचे संकटमोचक अशी ओळख.
- सात टर्म आमदार.
- 2013 ला मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत.
- देशातल्या सर्वात श्रीमंत राजकारण्यांपैकी एक.
- अहमद पटेलांच्या राज्यसभा विजयात मोठा वाटा.
- 2018 साली सरकार वाचवण्यात मोठी भूमिका.
- संघटन कौशल्यामुळे देशात चर्चेत.
- 2019 भ्रष्टाचारप्रकरणी अटक.
कोण आहेत सिद्धारमय्या?
- जनता दल, जेडीएस ते काँग्रेस असा राजकीय प्रवास.
- 2005 पासून काँग्रेसमध्ये सक्रिय.
- 2013 ते 2018 कर्नाटकचे मुख्यमंत्री.
- दलित, मुस्लीम मतदारांमध्ये प्रसिद्ध.
- मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार.
ही बातमी वाचा: