DK Shivakumar: उपमुख्यमंत्री आणि सहा खाती.... मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये मागे पडलेल्या डीके शिवकुमार यांना राहुल गांधींची ऑफर
Karnataka Government Formation: राहुल गांधी यांनी बुधवारी डीके शिवकुमार यांच्याशी सुमारे तासभर चर्चा केली. दरम्यान, मुख्यमंत्रिपदासाठी सिद्धरामय्या यांचे नाव निश्चित झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
नवी दिल्ली: कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदासाठी सुरू असलेल्या शर्यतीमध्ये सिद्धारमय्या (Siddaramaiah) यांनी डीके शिवकुमार (DK Shivakumar) यांना धोबीपछाड दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदासाठी सिद्धरमय्या यांचं नाव अंतिम झाल्याची माहिती आहे. यामुळे नाराज झालेल्या डीके शिवकुमार यांना आता उपमुख्यमंत्रीपद आणि सहा खात्यांची ऑफर दिल्याची माहिती आहे. राहुल गांधी यांनी डीके शिवकुमार यांच्याशी चर्चा करून ही ऑफर दिली असून त्यावर डीके शिवकुमार यांनी अद्याप त्यांचा निर्णय दिला नाही असंही सूत्रांनी सांगितलं.
कर्नाटकचा पुढील मुख्यमंत्री निवडण्यासाठी सुरू असलेल्या मंथनादरम्यान माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांनी आज राहुल गांधी यांची स्वतंत्रपणे भेट घेतली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डीके शिवकुमार यांना सहा खात्यांसह उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर देण्यात आली आहे. सूत्रांनी सांगितले की या ऑफरवर अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नसला तरी डीके ही ऑफर स्वीकारू शकतात.
राहुल गांधी आणि काँग्रेस नेतृत्वाने डीके शिवकुमार यांना हा प्रस्ताव दिला आहे. काँग्रेस संसदीय पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी 10 जनपथ येथे दोन्ही नेत्यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली. सिद्धरामय्या यांनी राहुल गांधींशी सुमारे अर्धा तास चर्चा केली. तर शिवकुमार यांनी त्यांच्याशी तासाभराहून अधिक वेळ चर्चा केली. राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर शिवकुमार काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी पोहोचले.
Karnataka Government Formation: सिद्धरामय्या यांचे नाव अंतिम
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धरामय्या यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी फायनल झाले आहे. शपथविधी शनिवारी किंवा रविवारी होण्याची शक्यता आहे. खरे तर कर्नाटकच्या विजयाचा मोठा संदेश देण्यासाठी आणि विरोधकांची एकजूट दाखवण्यासाठी काँग्रेस सिद्धरामय्या यांच्या शपथविधी समारंभाला विरोधी पक्षांच्या नेत्यांना आमंत्रित करू शकते. गांधी परिवार आणि काँग्रेसशासित राज्यांचे मुख्यमंत्रीही या सोहळ्यात सहभागी होणार आहेत.
शपथविधी उद्याही होऊ शकतो
मात्र, डीके शिवकुमार यांच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर शपथविधी झाल्यास उद्याच कार्यक्रम होऊ शकतो. याआधी मंगळवारीही मुख्यमंत्री निवडीवरून काँग्रेसमध्ये जोरदार मंथन सुरू होते. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आधी राहुल गांधींशी चर्चा केली आणि नंतर सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांची स्वतंत्रपणे भेट घेतली. खरगे यांनी सोमवारी पक्षाच्या तिन्ही निरीक्षकांशी चर्चाही केली होती. निरीक्षकांनीही त्यांच्या मताच्या आधारे आमदारांना अहवाल सादर केला होता.