International Tiger Day 2021 : मानव-वन्यजीव संघर्ष टाळायचा असेल तर वाघांचं संवर्धन अत्यावश्यक
International Tiger Day : वाघ हा निसर्गातील महत्वाचा घटक आहे. तो जगला तर निसर्गाची अन्नसाखळी सुरळीत राहू शकेल. वाघांच्या संवर्धनासाठी दरवर्षी 29 जुलैला आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस साजरा केला जातो.
International Tiger Day 2021 : वाघ हा निसर्गातील की-स्टोन प्रजातींपैकी एक मानला जातो. वाघांमुळे निसर्गाची विविधता आणि संपन्नता कायम राहते. निसर्गाच्या अन्न साखळीमध्ये त्याचे स्थान सर्वात वरचे आहे. त्यामुळे निसर्गातील इतर प्राण्यांच्या संख्येमध्ये समतोलता राहून पर्यायाने निसर्गातील समतोलता टिकवली जाते. पण नैसर्गिक अधिवास नष्टता, अवैध शिकार, तस्करी, जंगलतोड आणि इतर कारणांमुळे आज वाघांची संख्या प्रचंड वेगाने कमी होतेय. त्यावर जागरुकता करण्यासाठी दरवर्षी 29 जुलैला आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस साजरा करण्यात येतोय.
व्याघ्र दिनाचा इतिहास
रशियातील सेंट पीटर्सबर्ग मध्ये 29 जुलै 2010 साली झालेल्या व्याघ्र संवर्धनाच्या शिखर परिषदेत आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन साजरा करण्याची घोषणा करण्यात आली. या दिवसाचा उद्देश वाघांच्या नैसर्गिक अधिवासांच्या संवर्धनासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न करणे, तसेच त्याबद्दल जनजागृती करणे आणि वाघांच्या संवर्धनासाठी येणाऱ्या समस्यांवर उपाययोजना करणे असा आहे. त्या माध्यमातून मानव-वाघ संघर्षाची दरी कमी करणे आणि निसर्गाचे संवर्धन करणे साध्य केले जाऊ शकेल.
आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवसाची घोषणा करताना 2022 पर्यंत जगभरातील वाघांची संख्या दुप्पट करण्याचं ध्येय ठेवण्यात आलं. जगभरातील वाघांच्या संख्येपैकी 75 टक्के वाघ हे केवळ भारतात सापडतात. भारतामध्येही 2022 पर्यंत वाघांची संख्या दुप्पट करण्याचं ध्येय ठेऊन त्याच्या संवर्धनाचं काम करण्यात येतंय.
आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनाची थीम
दरवर्षी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन साजरा करताना एक थीम तयार केली जाते आणि पुढच्या वर्षभरात त्यावर काम केलं जातं. या वर्षीच्या व्याघ्र दिनाची थीम ही “Their Survival is in our hands” अशी आहे.
विसाव्या शतकाच्या सुरुवातीला जगभरात सुमारे एक लाखांहून अधिक वाघ होते. वर्ड वाईल्डलाईफ फंडच्या आकडेवारीनुसार सध्या ही संख्या केवळ 3900 इतकी आहे. यापैकी सुमारे 2,967 वाघ हे केवळ भारतात आढळतात. त्यामुळे या दिवसाचे महत्त्व भारतासाठी विशेष आहे.
भारतात सापडणारा बेंगॉल टायगर हा जगातील वैशिष्ट्यपूर्ण प्राण्यांपैकी एक मानला जातो. परंतु, अनिर्बंध शिकार आणि अधिवासावरील अतिक्रमणांमुळे त्यांची संख्या कमी होत आहे. वाघांची तस्करीसाठी अनिर्बंध शिकार, जंगलतोड आणि वाघांच्या अधिवासावर अतिक्रमण यामुळे मानव आणि वाघांमध्ये संघर्ष निर्मांण होताना दिसत आहे.
'प्रोजेक्ट टायगर'ची सुरुवात
वाघांच्या संवर्धनासाठी 1973 साली भारत सरकारने प्रोजेक्ट टायगर हा प्रकल्प सुरु केला. बेंगॉल टायगर म्हणजे वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. प्रोजेक्ट टायगरच्या माध्यमातून वाघांच्या नैसर्गिक अधिवासाचे संवर्धन करण्याचा प्रयत्न सुरु झाला. प्रोजेक्ट टायगरसाठी नॅशनल टायगर कन्झर्व्हेशन ऑथोरिटी स्थापन करण्यात आली. M-STrIPES या मॉनिटरिंग सिस्टिमच्या माध्यमातून वाघांच्या हालचालीवर पाळत ठेवण्यात आली. त्यामुळे आपोआपच त्यांच्या शिकारीवर नियंत्रण आले.
मे 2021 च्या आकडेवारीनुसार, भारतात सध्या 51 व्याघ्र प्रकल्प आहेत. भारतामध्ये 2018 च्या आकडेवारीनुसार, 2,967 वाघ आढळतात. मध्य प्रदेशमध्ये 526, कर्नाटकमध्ये 524, उत्तराखंडमध्ये 442, महाराष्ट्रात 317, तामिळनाडूमध्ये 264 आसाममध्ये 190 वाघ आढळतात.
निसर्गाच्या अन्नसाखळीत वाघ हा अत्यंत महत्वाची भूमिका बजावतोय. विकासाच्या नावाखाली मानवाने सुरु केलेल्या काही नकारात्मक कृतींमुळे वाघांचा नैसर्गिक अधिवास नष्ट होताना दिसत आहे. त्यातूनच मग मानव-व्याघ्र संघर्षाची धग वाढत आहे. हा संघर्ष कमी करायचा असेल तर मानवाने वाघांच्या नैसर्गिक अधिवासामध्ये अतिक्रमण करणे बंद करायला हवं. ज्या ठिकाणी वाघांचा अधिवास असतो त्या ठिकाणी जंगलं असतात. वाघांचा संबंध थेट निसर्गाच्या संवर्धनाशी असतो. त्यामुळे वाघांचे संवर्धन केल्यास पर्यायाने निसर्गाचेही संवर्धन होऊ शकेल आणि मानव-वन्यजीव सहअस्तित्व टिकू शकेल.
On #InternationalTigerDay, let us redouble our commitment to protect tigers & their habitat. Conservation of tigers is important as it leads to conservation of many species in the same habitat. I am happy that India's tiger population has increased significantly in recent years. pic.twitter.com/VLuP8e4WqL
— Vice President of India (@VPSecretariat) July 29, 2021
संबंधित बातम्या :
- Environment Day Special : मानव वन्यजीव सह-अस्तित्वाचं आदर्श उदाहरण, बिलिगिरी रंगास्वामी व्याघ्र प्रकल्प
- World Environment Day : हे दशक 'परिसंस्था पुनर्संचयन दशक'; पर्यावरणाचं संवर्धन करण्याचं संयुक्त राष्ट्रांच्या संघटनांचं आवाहन
- Environment Day Special : लिव्हिंग रुट ब्रिज; मेघालयातील निसर्गाचा अद्भूत आविष्कार