(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Indigo Flight: रन वेवर इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड, नौदलाच्या मदतीने प्रवाशांची सुटका
Indigo Flight Breakdown: गोव्यातील विमानतळावर रन वेवर जात असताना इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याचं स्पष्ट झालं.
पणजी: गोव्याहून मुंबईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या (IndiGo Airlines) इंजिनमध्ये बिघाड झाल्याची घटना आज घडली. विमान उड्डाण घ्यायच्या आधी रन वेवर जात असताना विमानाच्या डाव्या बाजूच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर नौदलाच्या मदतीने या विमानातील प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं. गोवा एअरपोर्ट ऑथोरिटीने ही माहिती दिली.
रन वेवर जाताना विमानाच्या इजिनमध्ये बिघाड झाल्याचं पायलटला सूचना मिळाली. त्यानंतर पायलटने विमानाचे उड्डाण थांबवलं. या विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दुसऱ्या विमानाच्या माध्यमातून मुंबईला पोहोचवण्यात येईल असं इंडिगो कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं.
रन वेवर जात असताना विमानात बिघाड झाल्याचं कळताच त्या विमानातील प्रवाशांची सुटका करण्यासाठी नौदलला पाचारण करण्यात आलं. नौदलाने या विमानाला टॅक्सी बेमध्ये नेलं. नंतर या विमानातील 187 प्रवाशांची सुटका करण्यात आली.
इंडिगो विमानांसंबंधी गेल्या काही दिवसात सातत्याने या प्रकारच्या घटना घडत असल्याचं दिसून येत आहे. या आधी पाकिस्तानमधील कराचीत इंडिगो विमानाला एमर्जन्सी लँडिंग करावी लागली होती. शारजा-हैदराबाद विमानात पायलटला विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून विमानाला कराचीच्या दिशेने वळवण्यात आले. हे विमान शारजाहून हैदराबाद येथे जात होतं. मिळालेल्या माहितीनुसार, विमानात काही तांत्रिक बिघाड उद्भवल्याने विमानाची एमर्जन्सी लँडिंग करण्यात आली.
जून महिन्यात इमर्जन्सी लॅडिंग
जून महिन्यात अशीच एक घटना घडली होती. गुवाहाटीहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाने उड्डाण घेतल्यानंतर एका पक्ष्याची विमानाला धडक बसली. यानंतर विमानांचं गुवाहाटी विमानतळावर इमरजन्सी लँडिंग करण्यात आलं होतं.
व्हॉट्सअप चॅटमुळे विमानाचं इमर्जन्सी लॅंडिग
एक तरुण आणि त्याची गर्लफ्रेण्ड यांच्यातील व्हॉट्सअॅप चॅटमुळे मुंबईलाकडे जाणाऱ्या विमानाला तब्बल सहा तास उशीर झाल्याची घटना घडली होती. एवढंच नाही तर सर्व प्रवाशांना विमानातून उतरवण्यात आलं. त्यानंतर विमानात काही स्फोटकं आहेत का, याची तपासणी करण्यात आली होती.
हा तरुण आणि त्याची गर्लफ्रेंड चॅट करत होते. ते शेजारच्या सीटवर बसलेल्या महिला प्रवाशाने व्हॉट्सअॅप चॅट पाहिलं. त्या दोघांमधील चॅट संशयास्पद वाटल्याने महिला प्रवाशाने याची माहिती क्रू मेंबर्सना दिली. 'यू ऑर बॉम्बर' असं त्या मेसेजमध्ये लिहिलं होतं. क्रूने एअर ट्रॅफिक कंट्रोलरला सतर्क केलं आणि उड्डाणासाठी तयार असलेलं विमान पुन्हा माघारी पाठवलं. त्या तरुणाची आणि त्याच्या गर्लफेंडची चौकशी केल्यानंतर सहा तासांनी या विमानाचं उड्डाण करण्यात आलं.
महत्त्वाच्या बातम्या: