IndiGo Flight Delayed : 'यू ऑर बॉम्बर'...तरुणीचा बॉयफ्रेण्डला मेसेज आणि इंडिगो विमानाचं उड्डाण सहा तास रखडलं!
IndiGo Flight Delayed : एक तरुण आणि त्याची गर्लफ्रेण्ड यांच्यातील व्हॉट्सअॅप चॅटमुळे मुंबईला येणाऱ्या विमानाला तब्बल सहा तास उशीर झाला.
IndiGo Flight Delayed : कर्नाटकातील (Karnataka) मंगळुरुमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक तरुण आणि त्याची गर्लफ्रेण्ड यांच्यातील व्हॉट्सअॅप चॅटमुळे (WhatsApp Chat) मुंबईला (Mumbai) येणाऱ्या विमानाला (Flight) तब्बल सहा तास उशीर झाला. एवढंच नाही तर सर्व प्रवाशांना विमानातून उतरवण्यात आलं. त्यानंतर विमानात काही स्फोटकं आहेत का, याची तपासणी करण्यात आली.
जाणून घेऊया संपूर्ण प्रकरण काय आहे?
हा प्रकार रविवारचा म्हणजेच 14 ऑगस्टचा आहे. झालं असं की, इंडिगो एअरलाईन्सचं विमान मंगळुरुहून मुंबईच्या दिशेने उड्डाण करणार होतं. सर्व प्रवासी विमानात बसले असताना संबंधित तरुणाच्या शेजारच्या सीटवर बसलेल्या महिला प्रवाशाने व्हॉट्सअॅप चॅट पाहिलं. हा तरुण त्याच्या गर्लफ्रेण्डसोबत चॅट करत होता. त्या दोघांमधील चॅट संशयास्पद वाटल्याने महिला प्रवाशाने याची माहिती क्रू मेंबर्सना दिली. क्रूने एअर ट्रॅफिक कंट्रोलरला सतर्क केलं आणि उड्डाणासाठी तयार असलेलं विमान पुन्हा माघारी पाठवलं.
'यू आर बॉम्बर...' संशयास्पद मेसेजने महिला प्रवाशाकडून क्रू मेंबर्सकडे तक्रार
हा तरुण त्याच्या गर्लफ्रेण्डसोबत व्हॉट्सअॅपवर चॅट करत होता. गर्लफ्रेण्ड त्याच विमानतळावरुन बंगळुरुला जाणारं विमान पकडणार होती. दोघे आपापसात सुरक्षेवरुन मज्जामस्करी करत होते. याचवेळी 14B सीटवर बसलेल्या महिला प्रवाशाने 13A सीटवरील तरुणाच्या मोबाईल फोनवर आलेले मेसेज वाचले. ज्यात लिहिलं होतं की, 'यू ऑर बॉम्बर'. त्यानंतर ही महिला प्रवासी सतर्क झाली आणि या संशयास्पद मेसेजची माहिती क्रू मेंबर्सना देण्यासाठी महिला जागेवरुन उठली.
विमानाचं उड्डाण रोखलं, दोघांची चौकशी
यानंतर विमानाचं उड्डाण रोखण्यात आलं. क्रूने एअर ट्रॅफिक कंट्रोलरला याची माहिती दिली. संबंधित तरुणाची चौकशी करण्यासाठी त्याला विमानातून बसून उड्डाण करु दिलं नाही. तर त्याचवेळी त्याच्या गर्लफ्रेण्डची देखील चौकशी करण्यात आली. त्यामुळे तिला देखील बंगळुरुसाठी उड्डाण करणाऱ्या विमानात बसता आलं नाही.
सहा तासांनी विमानाचं उड्डाण, तक्रार नाही
सामानाच्या तपासाअंती सर्व 185 प्रवाशांना मंगळुरु-मुंबई विमानात पुन्हा बसवण्यात आलं आणि अखेर संध्याकाळी पाच वाजता विमानाने उड्डाण केलं. दरम्यान रात्री उशिरापर्यंत कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. कारण दोघांमधील गप्पा सुरक्षेवरुन झाल्या असल्या तरी त्या मैत्रीपूर्ण झाल्या, असं शहर पोलीस आयुक्त एन शशी कुमार यांनी सांगितलं.
इतर बातम्या
IndiGo offer: केवळ 1616 मध्ये विमान तिकीट! इंडिगोची जबरदस्त ऑफर, जाणून घ्या सविस्तर
Airfare Likely To Rise: विमान प्रवास होणार महाग? 31 ऑगस्ट 2022 पासून विमान कंपन्या ठरवणार भाडे!