Indian Army PC : सुधारा... नाहीतर संपवून टाकू, भारताचा पाकिस्तानला निर्वाणीचा इशारा; सहनशिलता संपली, आता जशास तसं उत्तर देण्याचा निर्धार
India Attack On Pakistan : भारताने ऑपरेशन सिंदूर सुरुच ठेवत पाकिस्तानच्या लाहोर शहराचं रक्षण करण्यासाठी लावलेली एअर डिफेन्स सिस्टीम भारताने उद्ध्वस्त केली आहे.

Indian Army PC On Pakistan Attack : भारत हल्ला करत असल्याचा पाकिस्तानचा दावा चुकीचा असून भारत दहशतवादी कारवायांना प्रत्युत्तर देत असल्याचं भारतीय परराष्ट्र खात्याने स्पष्ट केलं. यापुढे पाकिस्तानचा दहशतवाद खपवून घेतला जाणार नाही, त्याला जशास तसं उत्तर दिलं जाईल असंही स्पष्ट करण्यात आलं. गेल्या 65 वर्षांमध्ये सिंधू कराराचं पालन करणे ही भारताची सहनशिलता आहे. यापुढे भारत आपल्या हक्काचे पाणी वापरणार असंही या पत्रकार परिषदेतून स्पष्ट करण्यात आलं.
पाकिस्तानने भारतावर केलेल्या हल्ल्याला भारताने चोख उत्तर देत लाहोरसह अनेक ठिकाणच्या एअर डिफेन्स सिस्टिम निष्क्रिय केल्याची माहिती भारतीय लष्कराने दिली. पाकिस्तानने भारतातील 15 शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण भारताने तो हल्ला उधळून लावला आणि प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानच्या रडार यंत्रणा निष्क्रिय करुन दिला असल्याची माहिती देण्यात आली. भारताच्या या कारवाईची माहिती कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह आणि परराष्ट्र खात्याचे अधिकाऱ्यांनी दिली.
भारताने काय म्हटलं ?
भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानच्या कोणत्याही नागरी भागावर हल्ला केला नव्हता. पाकिस्तानने जर भारतावर हल्ला केला तर त्याला उत्तर देणार असं भारताने स्पष्ट केलं होतं. त्यानंतर अमृतसर,अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोटसह भारताच्या 15 शहरांवर पाकिस्तानचा हल्ल्याचा प्रयत्न केला. पण भारताने त्याला उत्तर देत तो हल्ला निष्क्रिय केला.
त्यानंतर भारताने पाकिस्तानच्या काही ठिकाणच्या रडार यंत्रणा निष्क्रिय केली. त्यामध्ये लाहोरमधील एअर डिफेन्स सिस्टिम नष्ठ करण्यात आली.
पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर गोळीबार आणि तोफांचा हल्ला केला. त्यामध्ये कुपवाडा, बारामुल्ला, उरी, पुंछ या ठिकाणांचा समावेश आहे. त्यामध्ये 16 नागरिकांचा मृत्यू झाला. तीन महिलांचा त्यामध्ये समावेश आहे.
पाकिस्तानकडून वारंवार सीमाभागत शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे. त्यामध्ये भारताच्या सर्वसमान्य नागरिकांचा जीव जात आहे. पण भारताने केलेल्या हल्ल्यात कोणत्याही पाकिस्तानी सर्वसमान्य नागरिकाचा जीव जात नाही. भारताने फक्त दहशतवादी तळांवर हल्ला केला.
या आधी पुरावे देऊन उपयोग झाला नाही
या आधी भारताने उरी, पठाणकोठ हल्ल्यांचे पुरावे देऊन दहशतवादी गटांवर कारवाई करावी अशी मागणी केली होती. पण पाकिस्तानकडून त्याला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. पाकिस्तानबाबतचा अनुभव चांगला नाही. भारताने दिलेल्या पुराव्यांचा वापर पाकिस्तानने दहशतवाद्यांना वाचवण्यासाठी केला.
धर्माचा वापर करून दहशतवाद पोसला जातोय
भारताने केलेल्या हल्ल्यामध्ये काही मशिदींचे नुकसान झाल्याचा दावा पाकिस्तानकडून करण्यात येत आहे. पण तो पूर्ण खोटा आहे. त्या ठिकाणी दहशतवाद्यांचे प्रशिक्षण तळ होते, त्या ठिकाणी दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जायचं. त्यामुळेच भारताने त्या ठिकाणी हल्ला केला. पाकिस्तान धर्माचा वापर करून दहशतवाद पोसत आहे.
16 एप्रिल रोजी पाकिस्ताचे लष्करप्रमुखांनी दहशतवाद्यांच्या धार्मिक भावना चेतावल्या. त्यानंतर 22 एप्रिल रोजी पहलगाम हल्ला करण्यात आला. पाकिस्तान आता म्हणतंय की ते भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देतील. पण खरं बघायचं झालं तर भारतच पाकिस्तानच्या दहशतवादाला प्रत्युत्तर देत आहे.























