Tawang Face Off : भारत-चीन तणावादरम्यान भारताचा लष्करी सराव, आजपासून हवाई दलाचा युद्धाभ्यास
Indian Air Force Exercise : भारत-चीन तणावादरम्यान अरुणाचल प्रदेशमध्ये आजपासून हवाई दलाचा युद्धाभ्यास सुरु होत आहे. भारत आणि चीनमध्ये 9 डिसेंबर रोजी संघर्ष झाला.
India-China Clash : भारत-चीन संघर्षादरम्यान आजपासून भारतीय हवाई दलाचा सराव सुरु होत आहे. भारतीय सैन्याने अरुणाचल प्रदेमधील (Arunachal Pradesh) तवांग सेक्टरमध्ये (Tawang Sector) चिनी सैन्याचा (China PLA) घुसखोरीचा डाव उधळून लावला. 9 डिसेंबर रोजी ही घटना घडली. यावेळी भारत-चीनमध्ये संघर्ष झाला. ही तणावपूर्ण परिस्थिती कायम असताना आजपासून भारत दोन दिवसीय युद्धाभ्यास करणार आहे. 15 आणि 16 डिसेंबर रोजी भारतीय हवाई दल आसाम आणि अरुणाचल प्रदेशसह उत्तर पूर्व राज्यांच्या एअर स्पेसमध्ये सराव करणार आहे.
हवाई दलाने या संदर्भात नोटम (NOTAM) म्हणजेच एअरमनला नोटीस देखील जारी केली आहे. दरम्यान, तवांगमधील भारत-चीन संघर्षापूर्वीच हा युद्धाभ्यास ठरवण्यात आला होता. या सरावादरम्यान अरुणाचल प्रदेशला लागून असलेल्या एलएसीवर भारतीय हवाई दलाच्या ताकदीचा नमुना नक्कीच पाहायला मिळेल.
राफेल, सुखोई, अपाचे हेलिकॉप्टरचा सराव
या सरावा दरम्यान भारतीय हवाई दलाची ताकद दिसणार आहे. राफेल, सुखोई, अपाचे यांसोबत हवाई दलातील विमानांचा सरहाव पाहता येणार आहे. हवाई दलाची सुखोई लढाऊ विमाने तेजपूर एअरबेसवर तैनात आहेत, तर राफेल लढाऊ विमानांची एक तुकडी हसिमारा येथे तैनात आहे. याशिवाय अपाचे हेलिकॉप्टर आणि वाहतूक विमाने जोरहाटमध्ये तैनात आहेत. या दोन दिवसीय सरावात हेलिकॉप्टर आणि लष्करी विमानेही सहभागी होणार आहेत. याशिवाय हवाई दलाच्या हवाई संरक्षण यंत्रणाही या सरावात भाग घेतील.
युद्धाभ्यासादरम्यान उड्डाणासाठी अलर्ट जारी
मिळालेल्या माहितीनुसार, अरुणाचल प्रदेश आणि आसाममध्ये होणाऱ्या या सरावासाठी हवाई दलाने 8 डिसेंबर रोजी नोटीस (NOTAM) जारी केली होती. या नोटामद्वारे अरुणाचल प्रदेश आणि आसामच्या हवाई हद्दीत उड्डाण करण्याबाबत चेतावणी देण्यात आली. नागरी उड्डाणे आणि सिव्हिल ATC यांना 15 आणि 16 ये दोन दिवसांमध्ये (15-16 डिसेंबर) अरुणाचल प्रदेश, आसाम आणि उत्तर पूर्व एअर स्पेसमध्ये उड्डाणासाठी अलर्ट म्हणून ही नोटीस जारी करण्यात आली.
भारतीय हवाई दल आणि शिलाँग (मेघालय) स्थित ईस्टर्न कमांडने या सराव संदर्भात कोणतीही अधिकृत माहिती शेअर केलेली नाही. मात्र, ईस्टर्न कमांडचे सर्व एअरबेस या सरावात सहभागी होण्याची शक्यता आहे. यामध्ये आसाममधील तेजपूर, झाबुआ आणि जोरहाट हवाई तळांचा समावेश असण्याची शक्यता आहे. याशिवाय बंगालचे हसिमारा आणि कलाईकुंडा आणि अरुणाचल प्रदेशची अॅडव्हान्स लँडिंग स्ट्रिप या सरावात प्रामुख्याने सहभागी होणार आहेत.
तवांगमध्ये भारत-चीन संघर्ष
9 डिसेंबर रोजी चीनने तवांगमधील प्रत्यक्ष ताबा रेषा ओलांडून भारतीय हद्दीत घुसखोरी प्रयत्न केला. चिनी सैन्याचा हा डाव भारतीय सैन्याने उधळून लावला. चिनी सैन्याने या घुसखोरीसाठी आधीच कट आखला होता. यावेळी दोन्ही सैन्यांमध्ये संघर्ष झाला. सुत्रांच्या माहितीनुसार, या संघर्षात सहा भारतीय जवान जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.