(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Coronavirus New Cases: ओमिक्रोनची भारतात एन्ट्री, 24 तासांत 8774 नव्या रुग्णांची भर, 621 जणांचा मृत्यू
New Covid-19 Cases: आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात सक्रिए रुग्णांची संख्या 1 लाख 5 हजार 691 इतकी झाली आहे.
New Covid-19 Cases : दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या ओमिक्रोन व्हेरिएंटनं जगभरात खळबळ माजवली आहे. ओमिक्रोन व्हेरिएंट डेल्टा व्हेरिएंटपेक्षा अधिक धोकादायक असल्याचं बोललं जातेय. या नव्या व्हेरिएंटनेही भारतात एन्ट्री केली आहे. शनिवारी संध्याकाळी भारतात ओमिक्रोन व्हेरिएंटचे दोन रुग्ण आढळले आहेत. दक्षिण आफ्रिकावरुन भारतात परतलेल्या दोन प्रवासी ओमिक्रोन व्हेरिएंटपासून बाधित असल्याचं शनिवारी समोर आलं आहे. यानंतर कर्नाटकसह देशभरात हायअलर्ट जारी करण्यात आलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओमिक्रॉन व्हेरिएंटबद्दल चिंता व्यक्त करत उपाययोजनाची चचपणी करण्याचा आदेश दिलाय. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांत देशात 8 हजार 774 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर 9 हजार 481 जणांनी कोरोनावर मात केली आहे. याच कालावधीत 621 जणांचा मृत्यू झालाय. दोन दिवसांच्या दैनंदिन आकडेवारी पाहिल्यास मृताच्या संख्येत वाढ झाल्याचं पाहायला मिळतेय. शनिवारी देशात 465 जणांचा मृत्यू झाला होता.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील सक्रीय रुग्णांची संख्या एक लाख पाच हजार 691 इतकी झाली आहे. कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्यामध्ये चढउतार पाहायला मिळतोय. शनिवारी देशात 8 हजार 318 नवे रुग्ण आणि 465 जणांच्या मृत्यू नोंद करण्यात आली होती. तर 10 हजार 967 रुग्णांनी कोरोनावर मात केली होती. याआधी शुक्रवारी 10 हजार 549 नवीन रुग्ण आढळले होते. याआधी 24 नोव्हेंबर रोजी 9119 नवीन रुग्ण आढळले होते. 23 नोव्हेंबर रोजी 9283 नवीन रुग्ण आढळले होते. 22 नोव्हेंबर रोजी 7579 नवीन रुग्ण आढळले होते. तर 21 नोव्हेंबर रोजी 8,488 नवीन रुग्ण आढळले होते.
देशात आतापर्यंत 121.94 कोटी लोकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. देशाचा रिकव्हरी रेट 98.34 टक्क्यांवर पोहचला. मार्च 2020 पासूनचा हा सर्वाधिक दर आहे. देशात आतापर्यंत 3,39,98,278 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
महाराष्ट्रातील कोरोनाची स्थिती :
कोरोनाबाधितांच्या (coronavirus) दैनंदिन रुग्णसंख्येत चढ उतार पाहायला मिळत आहे. राज्यात आज 889 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 738 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 80 हजार 799 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.67 टक्के आहे. राज्यात आज 17 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 8,237 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 87 हजार 522 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 1045 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6, 52 , 56, 850 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
पुण्यात गेल्या 24 तासात 94 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद -
पुण्यात गेल्या 24 तासात 94 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 104 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पुण्यात आतापर्यंत 496525 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात दोन कोरनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या पुण्यात 845 सक्रिय रुग्ण आहेत. आज पुण्यात 4569 नागरिकांची स्वॅब तपासणी झाली आहे.