...म्हणून मोदी 15 ऑगस्टला बुलेटप्रुफ एन्क्लोजरमधून भाषण करणार
नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवाला 15 ऑगस्ट रोजी धोका असल्याची इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे. 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनाला पंतप्रधान लाल किल्ल्यावरुन भाषण देतात. मागील वर्षी नरेंद्र मोदींनी बुलेटप्रुफ एन्क्लोजरमधून भाषण देण्याचा निर्णय आयत्यावेळी बदलला होता.
सुरक्षेच्या कारणामुळे यावर्षी पंतप्रधानांना बुलेटप्रुफ एन्क्लोजरमधून भाषण करावे लागणार आहे. तसंच भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनाही यासंदर्भातील सूचना देण्यात आली आहे. जर मोदींनी सुरक्षा यंत्रणांना सल्ला मान्य केला तर त्यांच्या आजूबाजूला एवढी कडेकोट सुरक्षा असण्याची ही पहिलीच वेळ असेल.
मागील काही दिवसात काश्मीरमध्ये वाढलेला असंतोष, घुसखोरीच्या वाढलेल्या प्रयत्नांमुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. त्यांनंतर मोदींना एन्क्लोजरमधून भाषण करण्याचा सल्ला सुरक्षायंत्रणांनी दिला.
माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या हत्येनंतर पंतप्रधानांच्या भाषणावेळी बुलेटप्रुफ एन्क्लोजर वापरले जाऊ लागले. मात्र 2014 मध्ये पहिल्यांदाच पंतप्रधानपदी विराजमान झालेल्या नरेंद्र मोदींनी ही प्रथा मोडित काढत एन्क्लोजरशिवाय भाषण केलं होतं.
आयएसआयएस, अल-कायदाशिवाय लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबूल मुजाहिद्दीन यांसारख्या अतिरेकी संघटनाही पंतप्रधान मोदींवर हल्ल्याचा कट रचत असतात.