PM Modi Independence Day Speech : 'भारताच्या सृजनाचा अमृत कालखंड', पंतप्रधान मोदींच्या भाषणातील दहा महत्वाचे मुद्दे
Independence Day 2021 PM Modi speech : 75 व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन जनतेला संबोधित केलं. पंतप्रधान मोदींच्या भाषणातील दहा महत्वाचे मुद्दे...
Independence Day 2021 PM Modi speech : देश आपल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. देशाच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन जनतेला संबोधित केलं. पंतप्रधानांनी म्हटलं की, पुढील 25 वर्षे होणारा प्रवास भारताच्या सृजनाचा अमृत कालखंड आहे. या अमृत कालखंडात आपल्या संकल्पांची पूर्तता, आपल्याला स्वातंत्र्याच्या 100 वर्षांपर्यंत नेईल, असं त्यांनी म्हटलं.
पंतप्रधान मोदींच्या भाषणातील दहा महत्वाचे मुद्दे
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू जी, देशाला एकजूट राष्ट्र म्हणून आकार देणारे सरदार वल्लभभाई पटेल किंवा भारताला भविष्याचा मार्ग दाखवणारे डॉ बाबासाहेब आंबेडकर, अशा प्रत्येक महान व्यक्तित्वांचे स्मरण देश करत आहे, देश या सर्वांचा ऋणी आहे
कोरोनाच्या जागतिक महामारीमध्ये आपले डॉक्टर, आपल्या परिचारिका, आपले निमवैद्यकीय कर्मचारी, सफाई कामगार, लस तयार करण्यामध्ये गुंतलेले शास्त्रज्ञ असोत, सेवा करणारे नागरिक असोत, हे सर्वच वंदन करण्यायोग्य आहेत
आपण स्वातंत्र्याचा आंनदोत्सव साजरा करतो मात्र फाळणीच्या वेदना आजही हिंदुस्तानचे हृदय विदीर्ण करतात. काल देशाने एक भावुक निर्णय घेतला. आता 14 ऑगस्ट हा दिवस फाळणी वेदना स्मृती दिन म्हणून पाळला जाईल. इथून प्रारंभ होत पुढील 25 वर्षे होणारा प्रवास भारताच्या सृजनाचा अमृत कालखंड आहे. या अमृत कालखंडात आपल्या संकल्पांची पूर्तता, आपल्याला स्वातंत्र्याच्या 100 वर्षांपर्यंत नेईल
सबका साथ-सबका विकास-सबका विश्वास हा मंत्र घेऊन आमची वाटचाल सुरू आहे. आज लाल किल्ल्यावरून मी आवाहन करतो, सबका साथ-सबका विकास-सबका विश्वास आणि सबका प्रयास, आमच्या प्रत्येक उद्दिष्टाच्या प्राप्तीसाठी अतिशय महत्वाचे आहे
21 व्या शतकात भारताला नव्या उंचीवर नेण्यासाठी भारताच्या सामर्थ्याचा योग्य वापर होणे गरजेचे आहे. यासाठी जे वर्ग मागे आहेत त्यांना आपल्याला मदतीचा हात दिलाच पाहिजे
आपला पूर्व भारत, ईशान्य भाग, जम्मू काश्मीर, लडाखसह संपूर्ण हिमालय क्षेत्र असो, आपला किनारपट्टीचा भाग किंवा आदिवासी क्षेत्र असो, हे भाग भविष्यात भारताच्या विकासाचा मोठा आधार बनतील
आज आपण गावांमध्ये झपाट्याने परिवर्तन होत असताना पाहात आहोत. आता गावांमध्ये ऑप्टिकल फायबर नेटवर्क, डेटा यांचे बळ पोहोचू लागले आहे, गावात देखील डिजिटल उद्योजक तयार होत आहेत
देशातील जे जिल्हे मागास असल्याचे मानण्यात आले होते त्यांच्या आकांक्षा आम्ही जागृत केल्या आहेत. देशात 110 हून जास्त आकांक्षी जिल्ह्यात शिक्षण, आरोग्य, पोषण, रस्ते, रोजगार यांच्याशी संबंधित योजनांना प्राधान्य दिले जात आहे. यापैकी अनेक जिल्हे आदिवासी क्षेत्रात आहेत.
गावात आपल्या बचतगटांशी संबंधित 8 कोटीपेक्षा जास्त भगिनी आहेत, त्या एकापेक्षा एक उत्तम उत्पादने तयार करतात. या उत्पादनांना देशात आणि परदेशात मोठी बाजारपेठ मिळावी, यासाठी आता सरकार ई- कॉमर्स प्लॅटफॉर्म तयार करेल.
लहान शेतकरी देशाची शान बनेल हे आमचे स्वप्न आहे, आगामी वर्षात आपल्या देशातील लहान शेतकऱ्यांच्या सामूहिक शक्तीमध्ये आणखी वाढ केली पाहिजे. त्यांना नव्या सुविधा दिल्या पाहिजेत