Gorkha Regiment | मृत्यूलाही न घाबरणारे अशी ख्याती असणारी गोरखा रेजिमेन्ट भारतीय लष्कराचा भाग कशी झाली?
फील्ड मार्शल सॅम मानेकशॉ हे एकदा म्हणाले होते की, जर कोणी म्हणत असेल की मला मृत्यूची भीती वाटत नाही तर एक तो खोटं बोलत असेल किंवा एक तर तो गोरखा असेल. या गोरखा रेजिमेन्टची (Gorkha Regiment) स्थापना 24 एप्रिल 1815 साली करण्यात आली होती.

नवी दिल्ली : भारतीय लष्करातील एक धाडसी आणि बहादुर समजल्या जाणाऱ्या गोरखा रेजिमेन्टची स्थापना आजच्याच दिवशी म्हणजे 24 एप्रिल 1815 साली ईस्ट इंडिया कंपनीने केली होती. भारतीय लष्कराचा एक भाग असलेली ही गोरखा रेजिमेन्ट आपल्या धाडसाबद्दल जगभरात प्रसिद्ध आहे.
गोरखा समुदायाचे जवान हे हिमालयातील पर्वतीय भागातील, बहुतांशी नेपाळ आणि आजूबाजूच्या परिसरातील आहेत. परंतु साधारणपणे त्यांना नेपाळी समजले जाते. त्यांना अनेकवेळा बहादुर या नावाने बोलावले जाते. फील्ड मार्शल सॅम मानेकशॉ हे एकदा म्हणाले होते की, जर कोणी म्हणत असेल की मला मृत्यूची भीती वाटत नाही तर एक तो खोटं बोलत असेल किंवा एक तर तो गोरखा असेल.
गोरखा रेजिमेन्टची स्थापना कशी झाली?
ईस्ट इंडिया कंपनीने 1815 साली नेपाळच्या राजेशाही विरोधात युद्ध सुरू केलं. या युध्दात नेपाळचा पराभव झाला असला तरी त्याच्या लष्कराने मोठा पराक्रम केला होता. ईस्ट इंडिया कंपनीचे सर डेव्हिड ऑक्टरलोनी या गोरखा जवानांच्या पराक्रमाने प्रभावित झाले आणि त्यांनी गोरखा रेजिमेन्ट ही वेगळी बटालियन तयार करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्याच प्रयत्नाने 24 एप्रिल 1815 या दिवशी गोरखा रेजिमेन्टची स्थापना करण्यात आली.
गोरखा रेजिमेन्टने ब्रिटीशांना शिख युध्दांत आणि अफगाण युध्दात मोठं यश मिळवून दिलं. 1947 नंतर भारत, नेपाळ आणि ब्रिटनमध्ये एक करार करण्यात आला आणि सहा गोरखा रेजिमेन्ट या भारतीय लष्कराचा हिस्सा बनवण्यात आल्या. नंतरच्या काळात आणखी एक म्हणजे सातवी गोरखा रेजिमेन्ट तयार करण्यात आली. सध्या या सात रेजिमेन्टच्या 39 बटालियन भारतीय लष्कराच्या सेवेत आहेत.
गोरखा रेजिमेन्ट आज भारतीय लष्कराचा एक महत्वपूर्ण भाग आहे. या रेजिमेन्टला खासकरून पर्वतीय लढाईमध्ये महत्वाचे मानले जाते. कुक्री हा चाकू गोरखा रेजिमेन्टची ओळख आहे.
महत्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
