(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Gyanvapi Case : ज्ञानवापीच्या तळघरात पूजा सुरूच राहणार, पूजेला स्थगिती देण्यास अलाहाबाद उच्च न्यायालयाचा नकार
Gyanvapi Case : ज्ञानवापीच्या तळघरात पूजा सुरुच राहणार असल्याचं अलाहाबाद उच्च न्यायालयाने सांगितलं आहे.
नवी दिल्ली : ज्ञानवापी मशिदीमधील (Gyanvapi Case) तळघरातील पूजेला स्थगिती देण्यास अलाहाबाद उच्च न्यायालयाने नकार दिलाय.तसेच तळघरातील पूजा ही नेहमीप्रमाणे सुरुच राहणार असल्याचं देखील यावेळी न्यायालयाने सांगितलं. अलाहाबाद न्यायालयाच्या या निर्णयामुळे ज्ञानवापी मशीद कमिटीला कोणत्याही प्रकारचा दिलासा मिळाला नाही. ज्ञानवापीच्या तळघरात पूजा करण्याची मुभा देण्याचे आदेश जिल्हा न्यायालयाने दिले होते.
अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या या आदेशांविरोधात मशीद कमिटी उच्च न्यायालयात अपीलात आली होती. पूजेला स्थगिती देण्यासाठी या कमिटीकडून याचिका करण्यात आली होती. पण उच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती देण्यास नकार दिलाय. तसेच राज्य सरकारने कायदा सुव्यवस्था पाहावी असेही निर्देश अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेत.
तळघरात होणार पूजा
वाराणसीतील ज्ञानवापी तळघरात ही पूजा होणार आहे. जिल्हा न्यायालयाने हा आदेश दिला आहे. हिंदू याचिकाकर्त्यांच्या बाजूने निकाल देण्यात आला. हिंदू पक्षकारांचे वकील विष्णू शंकर जैन यांनी सांगितले की,व्यास कुटुंबीय आता तळघरात पूजा करणार आहेत. हिंदू पक्षाने व्यासजींच्या तळघरात पूजा करण्याची परवानगी मागितली होती. सोमनाथ व्यास यांचे कुटुंब 1993 पर्यंत तळघरात पूजा करत होते. 1993 नंतर तत्कालीन राज्य सरकारच्या आदेशावरून तळघरातील पूजा बंद करण्यात आली.
असा आहे तळघरात जाणारा रस्ता
वाराणसी कोर्टाच्या निकालानंतर नंदीच्या समोरून व्यासजीच्या तळघरात जाण्याचा मार्ग तयार करण्यात येणार आहे. कोर्टाच्या आदेशानंतर जिल्हा प्रशासनाच्या पातळीवर कारवाई करण्यात येणार आहे. कोर्टाने सात दिवसांच्या आत वाराणसीच्या जिल्हाधिकाऱ्यांना पूजेची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत.
अलाहाबाद उच्च न्यायालयाने नोटीस बजावली
दुसरीकडे, अलाहाबाद उच्च न्यायालयाने बुधवारी राखी सिंहच्या पुनर्विचार याचिकेवर ज्ञानवापी मशिदीच्या अंजुमन इंतेजामिया मस्जिद समितीला नोटीस बजावली. वाराणसी कोर्टाने ज्ञानवापी मशीद परिसरातील कथित शिवलिंग वगळता वजुखानाचे सर्वेक्षण करण्यास भारतीय पुरात्व विभागाला सर्वेक्षण करण्यास मनाई केली होती. त्या निर्णयाला याचिकाकर्त्या राखी सिंह यांनी आव्हान दिले आहे.
कडेकोट बंदोबस्तात ज्ञानव्यापी मशिदीचं सर्वेक्षण
कडेकोट बंदोबस्तात, एएसआयच्या टीमने मुख्य आवारातून घुमट, व्यासजींच्या तळघर आणि इतर भागात जाऊन तपास केला. तळघर सर्वेक्षणादरम्यान अनेक महत्त्वाचे पुरावे गोळा करण्यात आले होते. त्यावेळी माती, विटा, दगडाचे नमुनेही घेण्यात आले. या नमुन्यांच्या मदतीने, बांधकामाचा कालावधी आणि वय निश्चित केलं जाणार होतं.
ही बातमी वाचा :
Gyanvapi Case : मोठी बातमी! ज्ञानवापी मशीद तळघरात हिंदू पक्षकारांना पूजा करण्याचा अधिकार