Gujarat Election 2022: भाजपसाठी सोपी नाही गुजरात निवडणूक, काँग्रेसला बसणार धक्का; नव्या ओपिनियन पोलचा निष्कर्ष
Gujarat Election 2022: गुजरात निवडणुकीत भाजपकडून 150 जागांवर विजयी होण्याचा दावा केला जात असला तरी ओपिनियन पोलमध्ये वेगळे निष्कर्ष समोर आले आहेत.
Gujarat Election 2022: गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची (Gujarat Assembly Election) रणधुमाळी सुरू झाली आहे. भाजप (BJP), काँग्रेस (Congress) आणि आम आदमी पक्षामध्ये (AAP) लढत असल्याचे चित्र आहे. भाजपकडून यंदा विक्रमी विजय मिळवण्याचा दावा केला जात आहे. तर, दुसरीकडे काँग्रेसने परिवर्तन होणार असे म्हणत दंड थोपटले आहेत. आम आदमी पक्षानेही भाजप आणि काँग्रेसला आव्हान दिले आहेत. मात्र, ओपनियन पोलमधील (Gujarat Election Opinion Poll) निष्कर्षानुसार, गुजरातमध्ये विजय मिळवणे भाजपसाठी सोपी बाब नसल्याचे समोर आले आहे.
India Tv-Matrize ने गुजरात निवडणुकीसाठी केलेल्याओपिनियन पोलनुसार, भाजपच्या हाती काही प्रमाणात निराशा येण्याची शक्यता आहे. भाजपने 150 जागांवर विजय मिळवणार असल्याचा दावा केला आहे. India Tv-Matrize च्या ओपिनियन पोलनुसार, गुजरातमध्ये भाजपच्या नेतृत्वात सरकार येणार आहे. मात्र, भाजप नेत्यांकडून करण्यात येणारे दावे आणि जमिनीवरील वस्तुस्थिती वेगळी असल्याचे पोलमध्ये आढळले आहे.
कोणाला किती जागा?
ओपिनियन पोलनुसार, भाजपला 182 पैकी 104 ते 119 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर, काँग्रेसला 53 ते 68 जागांवर विजय मिळू शकतो. आम आदमी पक्षाला 0 ते 6 जागा मिळू शकते. तर, अपक्ष, इतरांना 3 जागा मिळू शकतात.
2017 मधील गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपला 99 जागांवर विजय मिळाला होता. इंडिया टीव्हीच्या ओपिनियन पोलमध्ये या जागांमध्ये वाढ होत असल्याचे संकेत आहेत. मात्र, या जागा पक्षाच्या नेतृत्वाकडून होत असलेल्या दाव्याच्या आसपासदेखील नाहीत. तर, विरोधी पक्ष काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. काँग्रेसला मागील विधानसभा निवडणुकीत 77 जागा मिळाल्या होत्या.
मतांची टक्केवारी किती?
ओपिनियन पोलनुसार, भाजपला 49.5 टक्के, काँग्रेसला 39.1 टक्के आणि आम आदमी पक्षाला 8.4 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. तर, अपक्ष, इतरांना 8.65 टक्के मते मिळाली होती. ओपिनियन पोलमध्ये मतांच्या टक्केवारीत फारसा बदल झाला नसला तरी जागांच्याबाबतीत मोठा बदल दिसून आला आहे.
कोणत्या भागात भाजप, काँग्रेसला किती जागा?
मध्य गुजरातमध्ये 61 जागा असून भाजपला 41 आणि काँग्रेसला 19 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर, आम आदमी पक्षाला आणि अन्य पक्षांना शून्य ते एक जागा मिळण्याचा अंदाज आहे. सौराष्ट्र-कच्छ भागात 54 जागा आहेत. या भागांमध्ये भाजपला 30 जागांवर आणि काँग्रेसला 21 जागांवर विजय मिळण्याचा अंदाज आहे. आम आदमी पक्षाला तीन जागांवर विजय मिळू शकतो. दक्षिण गुजरातमध्ये 35 जागा असून भाजपचे एकहाती वर्चस्व राहू शकते. भाजपला 26 जागा, काँग्रेसला 6 जागा आणि आम आदमी पक्षाला तीन जागा मिळण्याची शक्यता आहे. तर 32 जागा असलेल्या उत्तर गुजरातमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरस असणार असून दोन्ही पक्षांना प्रत्येकी 16-16 जागा मिळू शकतात.