(Source: ECI/ABP News/ABP Majha)
गोधरा हत्याकांडातील आरोपीला 19 वर्षांनंतर अटक, 2002 पासून होता फरार
गुप्त माहितीच्या आधारे गोधरा पोलिसांच्या पथकाने रविवारी रात्री रेल्वे स्थानकाजवळील सिग्नल फालिया भागातील घरावर छापा घातला आणि तेथून भटुकला अटक केली, अशी माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली.
वडोदरा : गोधरा हत्याकांडातील मुख्य आरोपी रफीक हुसेन भटुक याला पोलिसांनी तब्बल 19 वर्षानंतर गोधरा शहरातून अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती देताना एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, 51 वर्षीय रफीक हुसेन भटुक 2002 पासून फरार होता. फेब्रुवारी 2002 रोजी गुजरातच्या पंचमहलच्या गोधरा स्थानकात साबरमती एक्स्प्रेस ट्रेनच्या एका डब्याला जमावाने आग लावली होती. या घटनेत 59 कारसेवकांचा मृत्यू झाला होता.
भटुक 19 वर्षांपासून फरार होता
पंचमहलचे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक लीना पाटील यांनी वृत्तसंस्था पीटीआयला सांगितले की, 51 वर्षीय रफीक हुसेन भटुक हा संपूर्ण कटात सहभागी असलेला गोधरा हत्याकांडीतील आरोपींच्या मुख्य गटाचा एक भाग होता. भटुक मागील 19 वर्षांपासून फरार होता. गुप्त माहितीच्या आधारे गोधरा पोलिसांच्या पथकाने रविवारी रात्री रेल्वे स्थानकाजवळील सिग्नल फालिया भागातील घरावर छापा घातला आणि तेथून भटुकला अटक केली, अशी माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली.
रफीक हुसेन भटुक हा गोध्रा हत्याकांडातील मुख्य आरोपींपैकी एक आहे. गोधरा स्थानकात साबरमती एक्स्प्रेसचे डब्बे जाळण्याचा कट रचणाऱ्यांपैकी तो एक आहे. भटुक यांच्यावर कट रचणे, जमावाला भडकवणे आणि रेल्वेचा डबा पेटवण्यासाठी पेट्रोलची व्यवस्था करणे असे अनेक आरोप आहेत. या प्रकरणाच्या तपासात जेव्हा त्याचं नाव समोर आलं तेव्हा तो पळून गेला, अशी माहिती लीना पाटील यांनी दिली. फरार झाल्यानंतर भटुक अनेक वर्ष दिल्लीत होता. तेथे तो रेल्वे स्थानक आणि बांधकाम ठिकाणी मजूर म्हणून काम करत असत, असंही पाटील यांनी सांगितलं.
भटुकला गोधरा रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देणार
अलीकडेच त्याने घर बदलल्याची माहिती मिळाली होती आणि तो आपल्या कुटुंबाला भेटायलाही गेला होता. त्याला पकडण्याचा अनेकदा प्रयत्न केला गेला पण तो प्रत्येक वेळी निसटला. आता आमच्या टीमला त्याला अटक करण्यात यश मिळालं आहे. पुढील तपासासाठी आम्ही त्याला गोध्रा रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देऊ, असं लीना पाटील यांनी सांगितले.