Go First Flight: अजब कारभार! 50 प्रवाशांना न घेताच विमानाचे उड्डाण, आता नुकसानभरपाई म्हणून दिले 'हे' गिफ्ट
Go First Flight: गो फर्स्ट विमानाने 50 प्रवाशांना न घेताच उड्डण केले असल्याची घटना समोर आली आहे.
Go First Flight Took Off Without Passengers: प्रवाशांना उशीर झाला तर विमान वेळेवर उड्डाण घेत पुढील प्रवास करते. मात्र, बेंगळुरूमध्ये (Bengaluru) एक अजब घटना समोर आली आहे. बोर्डिंग पास घेतलेल्या 50 प्रवाशांना न घेताच एका विमानाने उड्डाण केले असल्याची घटना समोर आली आहे. गो एअर फर्स्ट (Go Air First) कंपनीचे हे विमान होते. आता कंपनीने या प्रकरणाची अंतर्गत चौकशी सुरू केली आहे. सोमवारी 9 जानेवारी रोजी ही घटना घडली.
Go Air च्या G8-116 बेंगळुरू-दिल्ली या विमानाच्या प्रवाशांना धक्कादायक अनुभवाला सामोरे जावे लागले. या विमानातून प्रवास करणाऱ्या 50 प्रवाशांनी चेक इन आणि बोर्डिंग पास घेतले होते. मात्र, प्रवाशांना न घेताच विमानाने उड्डाण केले. DGCA ने या प्रकरणात Go Air ची चूक असल्याचे म्हटले आहे. या बेजबाबदारपणासाठी चीफ ऑपरेशन मॅनेजरला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. DGCA ने केलेल्या प्राथमिक चौकशीत गो एअर कंपनीला प्रवाशांना योग्य प्रकारे हाताळण्यास अपयश आले असल्याचे आढळले आहे.
Most horrifying experience with @GoFirstairways
— Shreya Sinha (@SinhaShreya_) January 9, 2023
5:35 am Boarded the bus for aircraft
6:30 am Still in bus stuffed with over 50 passengers, driver stopped the bus after being forced.
Flight G8 116 takes off, leaving 50+ passengers.
Heights of negligence! @DGCAIndia
त्या प्रवाशांना मिळणार नुकसानभरपाई
या प्रकरणी गो एअरने पुढील आदेश येईपर्यंत त्या फ्लाइटच्या सर्व कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. गो एअरने त्या सर्व 55 प्रवाशांना देशभरात कुठेही प्रवास करण्यासाठी एक मोफत तिकीट देण्याची घोषणा केली आहे. 12 महिन्यांत हे प्रवासी देशातील कोणत्याही शहरासाठी तिकीट बुक करू शकतात. गो एअरने या संपूर्ण प्रकरणात प्रवाशांची माफी मागितली आहे.
प्रवाशांना विमानापर्यंत नेले
फ्लाइट G8 116 सोमवारी सकाळी 6.30 वाजता बेंगळुरूमधील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दिल्लीसाठी उड्डाण केले. चार बसमधून प्रवाशांना विमानाजवळ नेण्यात आले होते. विमान उड्डाणाची वेळ झाली तरी प्रवाशांना बसमध्ये ठेवण्यात आले होते. विमानाने उड्डाण केले तेव्हा जवळपास 55 प्रवासी बसमध्ये उपस्थित होते अशी माहिती सोशल मीडियावर एका युजरने दिली.
प्रवाशांना होती विमानाची प्रतिक्षा
बेंगळुरूमध्ये एका कंपनीत काम करणाऱ्या सुमित कुमार याने सांगितले की, सकाळी 6.20 वाजण्याच्या सुमारासचे विमान होते. आम्ही बसमध्ये जवळपास 54 जण होतो. बोर्डिंग पूर्णपणे झाली नव्हती. आमच्याकडे बोर्डिंग पास होते आणि लगेज चेक इन करण्यात आले होते. गो एअर कंपनीने सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास आम्हाला एअर इंडियाच्या विमानाचा पर्याय दिला होता.