Amarinder Singh On Sidhu: नवज्योतसिंह सिद्धू यांनी कुठूनही निवडणूक लढावी, मी त्यांना जिंकू देणार नाही : कॅप्टन अमरिंदर सिंग
Amarinder Singh On Sidhu: मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांच्या निर्णयावर नवज्योतसिंह सिद्धू यांच्या नाराजीबाबत अमरिंदर सिंह म्हणाले की, सरकार चालवण्यात कोणताही हस्तक्षेप होऊ नये.
Amarinder Singh On Sidhu: पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह दिल्लीचा दोन दिवसांचा दौरा संपवून आज चंदीगडला परतले. या दरम्यान त्यांनी स्पष्ट केले की ते काँग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये जाणार नाहीत. अशा परिस्थितीत अमरिंदर सिंह वेगळा पक्ष स्थापन करू शकतात अशी शक्यता आहे. नव्या पक्षा संदर्भात बोलताना ते म्हणाले की, पुढील रणनीती जवळच्या लोकांशी चर्चा केल्यानंतरच तयार केली जाईल.
चंदीगडला पोहोचलेल्या अमरिंदर सिंह यांनी सिद्धू यांना लक्ष्य केले आणि म्हणाले, "आगामी विधानसभा निवडणुकीत जिथून (सिद्धू) निवडणूक लढतील तिथं मी त्यांना जिंकू देणार नाही. सिद्धू पंजाबसाठी योग्य नाही. ”ते म्हणाले की सिद्धू यांचे काम पक्ष चालवणे आहे. मुख्यमंत्री चरणजीत चन्नी यांचे काम सरकार चालवणे आहे. सरकार चालवताना कोणीही हस्तक्षेप करू नये.
ते म्हणाले की, माझ्या साडेनऊ वर्षांच्या कार्यकाळात अनेक अध्यक्ष झाले. पण, सिद्धू यांनी जी परिस्थिती निर्माण केली आहे ती कधीच नव्हती. चरणजीत सिंह चन्नी सरकारच्या निर्णयावर नाराज होऊन नवज्योतसिंह सिद्धू यांनी 28 सप्टेंबर रोजी पंजाब काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. डीजीपी आणि महाधिवक्ता यांच्या नियुक्तीबाबत सिद्धू नाराज आहेत. या संदर्भात, सिद्धू आणि सीएम चन्नी यांच्यात सुमारे दोन तास बैठक चालली.
अमरिंदर सिंग यांनी गुरुवारी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल यांच्याशी झालेल्या बैठकीबद्दल सांगितले की, अनेक मुद्दे आहेत ज्यावर डोवाल यांच्याशी चर्चा झाली. पाकिस्तानकडून दररोज ड्रोन येत असल्याची चर्चा होती. कॅप्टन यांनी बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. यानंतर ते भाजपमध्ये जाणार असल्याच्या बातम्या येऊ लागल्या. मात्र, या बातम्यांचे खंडन करत मी भाजपमध्ये जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
..म्हणून कॅप्टन अमरिंदर सिंह यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा
पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नवज्योतसिंह सिद्धू यांची नियुक्ती केल्यानंतर सिद्धू आणि मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यातील वाद मिटण्याची आशा काँग्रेस हायकमांडला होती. पण तसं न होता हा वाद अधिक चिघळत गेला. शेवटी कॅप्टन अमरिंदर सिंह यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला.