मोठी बातमी! झासीत रुग्णालयात आगीचा भडका, 10 कोवळ्या नवजात बालकांचा होरपळून मृत्यू
उत्तर प्रदेशमधील झासी येथे मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. येथे रुग्णालयात लागलेल्या आगीत तब्बल 10 लहान मुलांचा होरपळून मृत्यू झाला आहे.
झांसी : उत्तर प्रदेशमधील झासी येथे मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. येथे एका रुग्णालयाला लागलेल्या आगीत तब्बल 10 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेनंतर संपूर्ण देश हादरला आहे. मिळालेल्या माहितीनुसार 15 नोव्हेंबरच्या रात्री दुर्दैवी घटना घडली. या आगीत होरपळलेल्या आणखी 16 नवजात मुलांचा जीव वाचावा यासाठी डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करत आहेत.
नेमकं प्रकरण काय? नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशमधील झासी येथे महाराणी लक्ष्मीबाई वैद्यकीय महाविद्यालय आहे. या वैद्यकीय महाविद्यालयातील निओनॅन्टल इन्टेन्सिव्ह केअर यूनिट (एनआयसीयू) विभागात 15 नोव्हेंबरच्या रात्री साधारण 10.45 वाजता अचानकपणे आग लागली. या विभागात असलेल्या ऑक्सिजन कॉन्सट्रेटरमध्ये अचानकपणे शॉर्टसर्किट झाल्याने ही आग लागली, अशी माहिती उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी दिली आहे.
7 बालकांची ओळख पटली, 3 बालकांची डीएनए टेस्ट
एनआयसीयू विभागात एकूण 54 बालकांना ठेवण्यातं आलं होतं. आगीची घटना घडली तेव्हा या रुग्णालयात एकच खळबळ उडाली. त्यानंतर या सर्व लहान मुलांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचा प्रयत्न करण्यात आला. प्रशासनाने एकूण 44 बालकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं. तर या दुर्घटनेत एकूण 10 बालकांचा मृत्यू झाला. दहापैकी एकूण सात मुलांची ओळख पटलेली आहे. उर्वरीत तीन मुलांची ओळख पटवण्यासाठी डीएनए टेस्ट केली जाण्याची शक्यता आहे.
फायर अलार्म बंद?
या दुर्घटनेतील एकूण 16 लहान मुलांवर उपचार चालू आहेत. त्यासाठी निष्णात डॉक्टर तैनात करण्यात आले आहेत. या दुर्घटनेचे काही व्हिडीओ समाजमाध्यमावर व्हायरल झाले आहेत. ही दुर्घटना पाहून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच उत्तर प्रदेशच्या प्रशासनावरही सडकून टीका होत आहे. या रुग्णालयातील फायर अलार्म बिघडलेला होता, असा दावा केला जात आहे. फायर अलार्म चालू नसल्यामुळेच आगीत एवढा विध्वंस झाल्याचा आरोप केला जातोय.
पाहा व्हिडीओ :
VIDEO | Visuals from inside the NICU (neonatal intensive care unit) of Jhansi Medical College where a fire broke out on Friday night. #Jhansifire
— Press Trust of India (@PTI_News) November 15, 2024
(Source: Third Party)
(Full video available on PTI Videos - https://t.co/n147TvrpG7) pic.twitter.com/8sr2fg6m9M
हेही वाचा :