Toolkit Case | टूलकिट प्रकरणात दिशा रवीला दिलासा, जामीन मंजूर
टूलकिट प्रकरणात दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने 21 वर्षीय पर्यावरणवादी कार्यकर्ती दिशा रवीला जामीन अर्ज मंजूर केला आहे. कोर्टाने एक लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर तिला जामीन मंजूर केला.
नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनाशी संबंधित टूलकिट प्रकरणात दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने 21 वर्षीय पर्यावरणवादी कार्यकर्ती दिशा रवी हिला जामीन अर्ज मंजूर केला आहे. दिल्ली पोलिसांनी तिला 13 फेब्रुवारी रोजी अटक केली होती. न्यायालयाने शनिवारी दोन्ही बाजू ऐकल्यानंतर आजसाठी आपला निर्णय राखून ठेवला होता. आज अतिरिक्त सत्र न्यायाधीश र्धमेंद्र राणा यांनी दिशा रवी यांना एक लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. याआधी दिशा रवीची कोठही पूर्ण झाल्यानंतर पटियाला हाऊस कोर्टाने तिला एक दिवसाच्या पोलीस कोठडीत पाठवलं होतं.
दिशा रवीची एक दिवसाची पोलीस कोठडी पूर्ण झाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांसमोर कोठडी वाढवण्याची मागणी केली. कोठडी वाढवण्याच्या सुनावणीदरम्यानच दिशा रवीच्या वकिलांनी मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांना माहिती दिली की, पटियाला हाऊस कोर्टाने दिशा रवी यांचा जामीन अर्ज मंजूर केला.शनिवारी कोर्टात काय झालं होतं? दिल्ली पोलिसांनी आज कोर्टात सांगितलं की, "या प्रकरणात काही महत्त्वाचे दस्तऐवज आहेत, जे आम्हाला सीलबंद लिलाफ्यात द्यायचे आहेत. यावर न्यायाधीश म्हणाले की, तुम्ही दस्तऐवज दाखल करा. न्यायाधीशांनी विचारलं की, दिशा रवीला कोणत्या कलमांतर्गत अटक केली आहे, यावर दिल्ली पोलिसांनी दस्तऐवज सोपवले.
दिल्ली पोलिसांनी सांगितलं की, "धालीवाल यांच्याकडून सोशल मीडियावर खलिस्तान समर्थनार्थ पेज बनवलं होतं. पोएटिक जस्टिस फाऊंडेशनने शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा वापर केला आणि भारताची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला. कॅनाडाच्या पोएटिक जस्टिस फाऊंडेशनशी संबंधित धालीवाल भारतात शेतकरी आंदोलनाच्या आड वातावरण बिघडवण्याच्या तयारीत होता. जर त्यांनी थेट कारवाई केली असता पर्दाफाश झाला असता त्यासाठी त्यांनी भारतात काही चेहऱ्यांचा आधार घेतला. पोएटिक जस्टिस फाऊंडेशन सातत्याने भारताविरोधात त्यांची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करतं."
दिल्ली पोलिसांनी म्हटलं की, "देशविरोधी कारवायांमध्ये सामील असणं हा मोठा गुन्हा आहे. दिशा रवीकडे हा अधिकार होता की ती टूलकिट एडिट करु शकत होती. दिशाने सर्व पुरावे मिटवण्यात आले. तिने पुराव्यांसोबत छेडछाड केली. दिशाने व्हॉट्सअॅप ग्रुप डिलीट केला होता. टूलकिटचे जे काही पुरावे होते ते देखील नष्ट केले. 11 जानेवारीला झूम मीटिंग घेण्यात आली, ज्यात धालीवालसह अनेक लोक सहभागी होते. 17 आणि 18 जानेवारीलाही झूमवर मीटिंग घेण्यात आली."
दिशा रवीच्या वकिलांनी काय म्हटलं? दिशा रवीचे वकिलांनी सांगितलं की, "शेतकऱ्यांच्या बाजूने बोलणं हा अपराध आहे का? दिल्ली पोलिसांची आरोप चुकीचे आहेत. दिल्ली पोलिसांनी सिख फॉर जस्टिसचा संबंध पोएटिक जस्टिस फाऊंडेशनशी जोडला." आपल्या वकिलांच्या माध्यमातून दिशाने म्हटलं की, "खलिस्तानशी काहीही देणंघेणं नाही. माझ्यावर आरोप आहे की आम्ही त्यांच्याशी बातचीत केली. पण हे सांगितलं नाही की आमचा त्यांच्याशी काय संबंध आहे.दिल्ली पोलीस बोलावतील तेव्हा संपूर्ण सहकार्य करेन. तपास होईपर्यंत मी देश सोडणार नाही. यासाठी मी शपथपत्र देण्यासही तयार आहे."
दिशाच्या वकिलांनी सांगितलं की, "लाल किल्ल्यावर जो काही हिंसाचार झाला त्यात त्यांनी टूलकिट वाचून कृत्य केलं असं समोर आलं का? पोलिसांनी एवढ्या लोकांना अटक केली, पण त्यापैकी किती लोकांनी टूलकिट वाचली हे सांगितलं का? दिल्ली पोलिसांनी परवानगी दिल्यानंतर हजारो लोक दिल्लीत आले, मी जर 10 लोकांना बोलावलं तर असं काय केलं? मोर्चाचे आयोजक कोण आहेत, ते तर संयुक्त किसान मोर्चा आहे. त्यांच्यावर देशद्रोहचा आरोप लावला का? "माझं बोलणं संपलं, तुम्ही आम्हाला जामीन द्या."