facebook : 2022 फेसबुक कम्युनिटी अॅक्सेलरेटर प्रोग्राम जाहीर, भारतातून 15 ग्रुप्सची निवड
facebook community Program : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुककडून त्यांचा 2022 फेसबुक कम्युनिटी अॅक्सेलरेटर प्रोग्राम जाहीर केला आहे. त्यासाठी त्यांनी भारतातून 15 ग्रुप्सची निवड केली आहे.
facebook community Program : फेसबुकने 2022 साठी कम्युनिटी अॅक्सेलरेटर प्रोग्राम ( facebook community accelerator program ) जाहीर केला आहे. या प्रोग्रामसाठी भारतातील ग्रप्सची घोषणा देखील केली आहे. 2022 अॅक्सेलरेटर प्रोग्राम हा चार महिन्यांचा आहे. फेसबुकच्या या प्रोग्रामच्या माध्यमातून फेसबुकने निवडलेल्या ग्रुप प्रमुखांना विविध उपक्रमांसाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी फेसबुककडून या प्रमखांना मार्गदर्शन करण्यासह निधी देखील देण्यात येणार आहे. फेसबुकने एक निवेदन जारी करून याबाबतची माहिती दिली आहे.
"अॅक्सेलरेटर प्रोग्रामसाठी निवडलेल्या टीच्या प्रमुखांना भारतातील आमच्या भागीदार T-Hub द्वारे प्रत्येक गटाला 40,000 डॉलर्सचे अनुदान देण्यात येईल. हा कार्यक्रम गट प्रमुखांना विविध साधनांचा वापर करून एक आकर्षक गट कसा तयार करायचा हे शिकण्यास मदत करेल, असे फेसबुकने आपल्या निवेदनात म्हटले आहे.
"आज आम्ही भारतातून यंदाच्या कम्युनिटी अॅक्सेलरेटर प्रोग्राममधील ग्रुप्सची घोषणा करत आहोत. आम्हाला जगभरातून या वर्षीसाठी 4,800 हून अधिक अर्ज मिळाले आहेत. भारतातून निवडण्यात आलेल्या ग्रुप्समध्ये युएनआयएमओ युनिव्हर्स ऑफ मॉम्स, जेनशिन इम्पॅक्ट एशिया, इंडियन बर्ड्स, बाल्कनी गार्डनिंग टिप्स, तेलुगू मॉम्स नेटवर्क, द ऑर्डर ऑफ पेन, ऑफिस मेमेस फॉर वर्किंग टीन्स – ओएमएफडब्ल्यूटी, वीविमेन, निशमधुलिका रेसिपी ग्रुप (ऑफिशियल), पॅरेण्ट ट्राइब बाय सुपरबॉटम्स, बॅटलग्राऊण्ड्स मोबाइल इंडिया, डिप्रेशन अॅण्ड अॅक्शिएटी सपोर्ट, डॉग लव्हर, दिल्ली फूडीज आणि बॅकपॅकर्स अॅण्ड ट्रॅव्हलर्स इंडिया (बीएटीआय) या ग्रुपचा समावेश असल्याची माहिती फेसबुककडून देण्यात आली.
निवडलेल्या ग्रुप्सच्या प्रमुखांना भारतातील टी-हबच्या माध्यमातून अनुदान देण्यात येईल. तसेत तज्ञांच्या मार्गदर्शनासह अभ्यासक्रम आणि वैयक्तिक प्रशिक्षणाच्या माध्यमातून गट प्रमुखांना मार्गदर्शन करण्यात येईल. या मार्गदर्शनामुळे गट प्रमुख त्यांचे गट संघटित आणि प्रबळ करू शकतील. याबरोबरच हे प्रमख त्यांच्या सहकारी गट प्रमुखांसोबत माहितीची देवाण-घेवाण करणाऱ्या सत्रांमध्ये देखील सहभाग घेऊ शकतील आणि त्यांना उद्योगातील प्रमुख कंपन्यांसोबत काम करण्याची संधी मिळेल. हा उपक्रम गट प्रमुखांना विविध कंटेन्ट स्वरूपांचा वापर करत सर्वसमावेशक गट कसा तयार करावा हे शिकण्यासाठी मदत करेल.
कम्युनिटी अॅक्सेलरेटर निवड समितीने त्यांच्या या प्रोग्रामिंगमधून लाभ होईल आणि उपक्रमामध्ये संपूर्णपणे संलग्न होण्याची क्षमता आहे अशा गटांचा शोध घेतला. उद्देश, नेतृत्व अनुभव, स्थिरता व कटिबद्धता अशा विविध घटकांनुसार गटांची निवड करण्यात आली. सहभागी झालेले ग्रप विविध प्रकारच्या इतर ग्रुपचे प्रतिनिधीत्व करतात. हे सर्व ग्रुप मनोरंजन, पर्यटन, अन्न, बागकाम, पालकत्व, सक्षमीकरण अशा गोष्टींशी संबंधित जागतिक आव्हानांचे निराकरण करण्याचे काम करतात.
काय आहे फेसबुक कम्युनिटी अॅक्सेलरेटर प्रोग्राम?
2022 फेसबुक कम्युनिटी अॅक्सेलरेटर प्रोग्राम हा चार महिन्यांचा कार्यक्रम आहे. जो Facebook गटांमधील निवडक प्रमुखांना त्यांच्या ग्रप्सचा प्रभाव वाढवणाऱ्या उपक्रमांसाठी प्रशिक्षण देईल, मार्गदर्शन करेल आणि त्यासाठी निधी देखील देईल.