ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याचा आज दुसरा दिवस, हैदराबाद हाऊसमध्ये ट्रम्प आणि मोदीत द्विपक्षीय चर्चा
सोमवारी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी अहमदाबाद आणि आग्रा येथे भेट दिली. अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडियममध्ये 'नमस्ते ट्रम्प' या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय भारत दौऱ्यावर आले असून आज त्यांच्या दौऱ्याचा दुसरा आणि शेवटचा दिवस आहे. सकाळी 10 वाजता डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलानिया ट्रम्प यांचं राष्ट्रपती भवनात पारंपारिक पद्धतीने स्वागत करण्यात येईल. भारतीय सैन्यदलाकडून 'गार्ड ऑफ ऑनर' देखील देण्यात येणार आहे. यादरम्यान भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित राहणार आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी ट्रम्प यांच्या स्वागतासाठी उपस्थित असलेल्या भारतीय प्रतिनिधिमंडळात अमित शाह, राजनाथ सिंह, एस जयशंकर, रविशंकर प्रसाद, डॉ. हर्षवर्धन, जिंतेंद्र सिंह आणि हरगीप पूरी उपस्थित राहणार आहेत.
यानंतर सकाळी 10.45 वाजता ट्रम्प आणि मेलानिया राष्ट्रपती भवनातून थेट राजघाटावर जाऊन महात्मा गांधींच्या समाधीला अभिवादन करणार आहेत.
पाहा व्हिडीओ : डोनाल्ड ट्रम्प यांचा दौरा डोळ्यासमोर ठेऊनच हिंसाचार?
सकाळी 11.30 वाजता नवी दिल्लीमधील हैदराबाद हाऊसमध्ये पंतप्रधान मोदी आणि अमेरकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यात द्विपक्षीय चर्चा होणार आहेत. यादरम्यान, अनेक मुद्यांवर दोन्ही देशांमध्ये चर्चा होणार आहे. परराष्ट्र सचिवांनी दिलेल्या माहितीनुसार, या चर्चेत दहशतवाद, सुरक्षा आणि व्यवहार यांसारख्या अनेक मुद्दयांवर दोन्ही नेते चर्चा करणार आहेत. त्यानंतर दोन्ही दिग्गज नेते आपली मतं मांडणार आहेत.
मेलानिया ट्रम्प दिल्ली येथील सरकारी शाळांमधील हॅप्पीनेस क्लासचा दौरा करून मुलांना भेटणार आहे. दुपारी तीन वाजता अमेरिकेच राष्ट्रपती यूएस दुतावास येथे जाऊन भारतातील मोठ्या उद्योगपतींना भेटणार आहेत.
संध्याकाळी जवळपास 7.25 वाजता ट्रम्प राष्ट्रपती भवनामध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना भेटणार आहेत. रात्री 8 वाजता राष्ट्रपती भवनामध्ये डोनाल्ड ट्रम्प आणि मेलानिया ट्रम्प यांच्यासाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर रात्री 10 वाजता दोघेही अमेरिकेसाठी रवाना होणार आहेत.
पाहा व्हिडीओ : डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याने प्रत्येक भारतीयामध्ये उत्साहाचं वातावरण : मोदी
दरम्यान, सोमवारी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी अहमदाबाद आणि आग्रा येथे भेट दिली. अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडियममध्ये 'नमस्ते ट्रम्प' या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना ट्रम्प म्हणाले की, अमेरिकेचं भारतावर प्रेम आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, 'अमेरिका भारताचा आदर करते आणि अमेरिका नेहमीच भारतीय नागरिकांचा इमानदार मित्र राहिल. आम्ही आयएसआयएसला शंभर टक्के संपवलं आहे. आम्हाला दहशतवादाची विचारधारा संपवायची आहे. याआधी डोनाल्ड ट्रम्प आणि मेलानिया ट्रम्प यांनी साबरमी आश्रमाचा दौरा केला होता.
ट्रम्प यांचा आजचा कार्यक्रम :
- सकाळी 9.40 वाजता डोनाल्ड ट्रम्प हॉटेल मौर्या शेरेटन येथून निघतील.
- सकाळी 10 वाजता ट्रम्प यांचं राष्ट्रपती भवनामध्ये आगमन आणि स्वागत केलं जाईल.
- सकाळी 10.30 वाजता राजघाटावर महात्मा गांधींच्या समाधीला अभिवादन करणार आहेत.
- सकाळी जवळपास 11 वाजता हैद्राबाद हाऊसमध्ये मोदी आणि ट्रम्प यांची भेट होईल.
- दुपारी 12.40 वाजता भेटीनंतर दोघेही सहमती करारावर आपलं मत व्यक्त करतील.
- दुपारी जवळपास 3 वाजता अमेरिका दुतावास येथे असणाऱ्या रुजवेल्ट हाउसमध्ये बिजनेस इव्हेंटचं आयोजन करण्यात येईल.
- दुपारी जवळापस 4 वाजता दुतावासात मी अॅन्ड ग्रीट होणार आहे.
- संध्याकाळी जवळपास 4 वाजता ट्रम्प पुन्हा हॉटेलवर परतणार आहेत.
- संध्याकाळी जवळपास 7.30 वाजता राष्ट्रपती भवनामध्ये स्नेहभोजनासाठी ट्रम्प जाणार आहेत.
- रात्री 8 वाजता राष्ट्रपती भवनात स्टेट बॅक्वेट होईल.
- रात्री 10 वाजता ट्रम्प अमेरिकेसाठी रवाना होतील.
संबंधित बातम्या :
PHOTOS | जेव्हा ट्रम्प दाम्पत्य 'ताजमहल' पाहून हरखून जातात
साबरमती आश्रम भेट : ट्रम्प यांना बापूंचा विसर, तर ओबामांनी जिंकलं होतं भारतीयांचं मन
'माय ग्रेट फ्रेण्ड मोदी', साबरमती आश्रमात ट्रम्प यांचा अभिप्राय; गांधीजींचा उल्लेखही नाही