एक्स्प्लोर
धारवाडमध्ये दुमजली इमारत कोसळून पाच जणांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती
दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. इमारतीचे दोन मजले बांधून पूर्ण झाले होते आणि त्या दोन मजल्यावरील दुकाने देण्यात आली होती. इमारत कोसळली त्यावेळी बहुतेक दुकाने उघडी होती. त्यामुळे दुकानांचे मालक आणि ग्राहक हे सगळे इमारतीत होते.

धारवाड : धारवाडमधील कुमारेश्वर नगरमध्ये दुमजली इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली असून यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या पन्नासहून अधिक जणांना बाहेर काढण्यात आले असून जखमींना सरकारी इस्पितळात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. अद्याप तीसपेक्षा अधिक जण ढिगाऱ्याखाली अडकले असून त्यांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
VIDEO | धारवाडमध्ये दुमजली इमारत कोसळून पाच जणांचा मृत्यू | कर्नाटक | एबीपी माझा
काल दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. इमारतीचे दोन मजले बांधून पूर्ण झाले होते आणि त्या दोन मजल्यावरील दुकाने देण्यात आली होती. इमारत कोसळली त्यावेळी बहुतेक दुकाने उघडी होती. त्यामुळे दुकानांचे मालक आणि ग्राहक हे सगळे इमारतीत होते.
या इमारतीच्या तिसऱ्या माजल्याचे बांधकाम सुरु होते. त्या ठिकाणी काही कामगार काम करत होते. काल दुपारी साडे चारच्या सुमारास काम सुरु असतानाच ही दुर्घटना घडली. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी या दुर्घटनेची गंभीर दखल घेतली असून मुख्य सचिवांना तातडीने मदत कार्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत.
अनेक जेसीबी मशीन तसेच क्रेनच्या मदतीने पडलेल्या इमारतीचे अवशेष काढण्याचे काम सुरु आहे. जिल्हाधिकारी दीपा चोळन आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी मदत कार्यावर लक्ष ठेवून आहेत. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना काढून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
आणखी वाचा
Advertisement
Advertisement


















