(Source: ECI/ABP News/ABP Majha)
बिपरजॉय चक्रीवादळापूर्वी गुजरातमध्ये मुसळधार पाऊस, 30 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवले
बिपरजॉय चक्रीवादळापूर्वी गुजरातमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. आत्तापर्यंत 30 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.
Cyclone Biparjoy : बिपरजॉय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. अरबी समुद्रातून येणारे हे वादळ काही दिवसांत गुजरातमध्ये धडकण्याची भीती वर्तवण्यात आली आहे. हे वादळ खूप भीषण स्वरूप धारण करू शकते, असा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. दरम्यान, बिपरजॉय चक्रीवादळापूर्वी गुजरातमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. आत्तापर्यंत 30 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.
15 जूनला चक्रीवादळ तीव्र होण्याची शक्यता
15 जून रोजी बिपरजॉय चक्रीवादळ तीव्र होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. सरकारही याबाबत सतर्क झाले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी मंगळवारी (13 जून) चक्रीवादळ बिपरजॉयच्या तयारीची आढावा बैठक घेतली. केंद्र सरकार आणि राज्यांनी मिळून 9 वर्षात अनेक आपत्तींना तोंड दिले आहे. या नवीन आपत्तीला तोंड देण्यासाठी सरकार पूर्णपणे तयार असल्याचे मत अमित शाह यांनी व्यक्त केले. 'बिपरजॉय' चक्रीवादळामुळे होणारे संभाव्य नुकसान कमी करणे हे आमचे उद्दिष्ट असल्याचे शाह म्हणाले.
गुजरातमध्ये पावसाला सुरुवात
बिपरजॉय चक्रीवादळामुळे गुजरातमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. तर मंगळवारी (13 जून) मुंबईत किमान तापमानात लक्षणीय घट नोंदवण्यात आली आहे. 'बिपरजॉय'च्या प्रभावामुळे गुजरातमधील अरवली जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पाऊस झाला आहे. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी लोकांना वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. आत्तापर्यंत 30 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे.
एनडीआरएफची तयारी
बिपरजॉय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफच्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत. गुजरातमधील कच्छ आणि सौराष्ट्र या भागांवर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आलं आहे. आतापर्यंत 30,000 हून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम करण्यात आले आहे. चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्या जिल्ह्यांमध्ये एनडीआरएफच्या 17 आणि एसडीआरएफच्या 12 पथके तैनात करण्यात आली आहेत.
काय म्हणाले मनसुख मांडविया?
त्याचवेळी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ट्विट केले की, "बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातच्या कच्छ जिल्ह्याकडे सरकत असताना रेशन आणि अन्नाची व्यवस्था आणि निवारागृहे उभारली जात आहेत. वैद्यकीय आणि आरोग्य आपत्कालीन परिस्थितींना तोंड देण्यासाठी. दुसऱ्या ट्विटमध्ये ते म्हणाले, “बिपरजॉय चक्रीवादळासाठी आमचे सैन्य पूर्ण तयारी करत आहे. भुजच्या लष्करी तळावर मी या तयारीचा आढावा घेतला. या संभाव्य संकटाबाबत त्यांनी लष्कराच्या जवानांशीही चर्चा केली.
महत्त्वाच्या बातम्या: