एक्स्प्लोर
हैदराबादेत नवदाम्पत्यावर कोयत्याने हल्ला, वडिलांवर संशय
संदीपच्या जीवाचा धोका टळल्याचं डॉक्टरांनी सांगितलं, तर माधवीच्या मानेवर गंभीर जखम झाल्यामुळे उपचार सुरु आहेत.
![हैदराबादेत नवदाम्पत्यावर कोयत्याने हल्ला, वडिलांवर संशय Couple attacked in Hyderabad over inter-caste marriage latest update हैदराबादेत नवदाम्पत्यावर कोयत्याने हल्ला, वडिलांवर संशय](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/09/20120636/Hyderabad-Madhavi-Sandeep-Attack-2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
हैदराबाद : वडिलांनीच आपली पोटची मुलगी आणि जावयावर कोयत्याने वार केल्याची घटना हैदराबादमध्ये उघडकीस आली आहे. जातीपातीच्या भ्रामक संकल्पनांतून वडिलांनी आपल्या लेकीच्या संसारावर घाला घातल्याची दुसरी घटना तेलंगणामध्ये पाहायला मिळत आहे.
हैदराबादमध्ये गजबजलेल्या एरगाडा रस्त्यावर 20 वर्षांची माधवी 21 वर्षांचा पती संदीप दिडलासोबत बाईकवर बसली होती. तितक्यात एक हेल्मेटधारी बाईकस्वाराने त्यांच्या शेजारी पार्किंग केलं. बाईकवरुन उतरुन त्याने हेल्मेट काढलं. बॅगमधून कोयता काढून त्याने संदीपवर सपासप वार करण्यास सुरुवात केली.
आपल्या नवऱ्यावर झालेला हल्ला पाहून माधवी बिथरली आणि तिने हल्लेखोराला जमिनीवर ढकललं. मात्र हल्लेखोराने तिच्यावरही कोयत्याने वार करण्यास सुरुवात केली. सुदैवाने एका पादचाऱ्याने हल्लेखोराला अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला कोयता दाखवून धमकवण्यात आलं.
बुधवारी दुपारी 3.30 वाजता घडलेला हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे. हल्ल्यात गंभीर जखमी झाल्यामुळे दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. संदीपच्या जीवाचा धोका टळल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. माधवीच्या मानेवर गंभीर जखम झाल्यामुळे उपचार सुरु आहेत.
पाच वर्षांपूर्वी शाळेत असताना माधवीची संदीपसोबत ओळख झाली. सध्या संदीप बीकॉमच्या शेवटच्या वर्षाला शिकत आहे.
अवघ्या आठवड्याभरापूर्वी एका मंदिरात ते विवाहबंधनात अडकले. त्यामुळे माधवीच्या कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार नोंदवली होती. परंतु तिने आपल्या कुटुंबाकडे परतण्यास नकार दिल्याने अखेर त्यांनी दोघांचं लग्न मान्य असल्याचं सांगितलं.
माधवीचे वडील मनोहर चारी या घटनेचे मुख्य सूत्रधार असल्याचा पोलिसांना संशय आहे. मनोहर चारी हे व्यवसायाने सोनार आहेत. त्यांनी नवदाम्पत्याला गोकुळ थिएटरजवळ भेटायला बोलवलं होतं. हल्ल्याच्या घटनेनंतर ते फरार आहेत.
अवघ्या काहीच दिवसांपूर्वी तेलंगणामध्ये हत्येची घटना घडली होती. 23 वर्षांच्या प्रणय कुमारने सहा महिन्यांपूर्वी अमृता वर्षिनीसोबत लग्न केलं होतं. अमृता गर्भवती असल्यामुळे तिला चेकअपसाठी रुग्णालयात नेलं होतं. त्यावेळी परत येताना प्रणयची हत्या झाली. अमृताने कनिष्ठ जातीतील युवकाशी लग्न केल्यामुळे नाराज वडिलांनी ही हत्या घडवल्याचा आरोप आहे.
![हैदराबादेत नवदाम्पत्यावर कोयत्याने हल्ला, वडिलांवर संशय](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/09/20172709/Hyderabad-Madhavi-Sandeep-Attack-580x395.jpg)
![हैदराबादेत नवदाम्पत्यावर कोयत्याने हल्ला, वडिलांवर संशय](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/09/20173331/Telangana-Murder-Amruta-Pranay.jpg)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)