एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Coronavirus | भारताकडे असलेल्या हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनसाठी ट्रम्प इतके अस्वस्थ का झाले आहेत?
कोरोनामुळे सगळं जग संकटात सापडलेलं आहे, रोज हजारो माणसं जगभरात मरतायत, पण त्यावर औषध काय याचं उत्तर मिळालेलं नाही. अशा स्थितीत ज्या औषधाकडून थोड्याफार आशा दिसतात तेही सर्वांना हवंहवंसं वाटू लागलंय. योगायोग म्हणजे जगाला ज्या औषधात आशा दिसतेय त्या औषधाचा सर्वात मोठा पुरवठादार भारत आहे. याच औषधावरुन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज भारताला इशारा देणारं एक वक्तव्यही केलं...पाहूया काय आहे यापाठीमागचे राजकारण.
नवी दिल्ली : हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन...हे औषध सध्या भारत आणि अमेरिकेतल्या संबंधांसाठी सर्वात महत्त्वाचं औषध बनलं आहे. हे औषध म्हणजे काही कोरोनावरचं अधिकृत औषध नाही. पण या औषधाासाठी जगातल्या सर्वात मोठ्या महासत्तेचा अध्यक्ष सध्या अगतिक झाला आहे. त्यामुळेच जो भारत हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनचा मोठा पुरवठादार आहे, त्याला धमकी देण्यापर्यंतही डोनाल्ड ट्रम्प यांची मजल गेली.
कोरोनाच्या संकटानंतर सर्वच देशांनी आवश्यक औषधांच्या निर्यातीवर बंदी आणली, जागतिक आरोग्य संघटनेचेही तसे निर्देश आहेत. भारतानेही 20 मार्चला तशी पावलं उचलली होतीच. 4 एप्रिलला तर हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनवर पूर्ण बंदी आणली. पण याच निर्णयानंतर तिकडे अमेरिकेत त्याची मागणी वाढू लागली होती आणि आज तर ट्रम्प यांनी असा इशारा दिला. त्यामुळे भारत नेमकी काय भूमिका घेतो याकडे सगळ्यांचं लक्ष होतं.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या या वक्तव्यानंतर भारताकडून अपेक्षित निर्णयाची घोषणाही झाली. एक जबाबदार राष्ट्र अशा महामारीच्या संकटात जी भूमिका निभावतं, ती आम्ही निभावू असं सांगत भारताने हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनवरच्या निर्यातीवर जी बंदी आणली होती ती हटवली आहे. देशातल्या मागणीचा आढावा घेऊन पुरेसा साठा असल्याचं लक्षात आल्यावर आपण ही बंदी उठवत असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन औषध न दिल्यास प्रत्युत्तर दिलं जाईल, डोनाल्ड ट्रम्प यांची भारताला धमकी
भारत सरकारने 14 औषधांवरची बंदी उठवली आहे. पॅरासिटेमॉल आणि हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन या दोन औषधांना लायन्सस्ड कॅटेगरीत ठेवून निर्यात केलं जाईल. त्यांच्या देशांतर्गत मागणीचा सातत्याने आढावा घेतला जाईल. आमच्या पुरवठ्यावरच जे देश अवलंबून आहेत त्यांना अशा संकटात मदत करणं हे आमचं कर्तव्य आहे, असं अनुराग श्रीवास्तव यांनी सांगितलं.
केवळ अमेरिकाच नव्हे तर श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ यासह 30 देशांना भारताकडून हायड्रोक्सिक्लोरोक्वीनची गरजेनुसार निर्यात होणार आहे. भारत हा हायड्रोक्सिक्लोरोक्वीनचा जगातला सर्वात मोठा पुरवठादार आहे. कारण जगात या एकूण औषधापैकी 70 टक्के हे भारतात तयार होतं.
पण गंमतीची बाब म्हणजे हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनवरुन इतकी सगळी रस्सीखेच सुरु असली तरी हे काही कोरोनावरचे अधिकृत औषध जाहीर झालेलं नाही. अमेरिकेत सध्या कोरोनाने थैमान घातलेलं आहे. साडेतीन लाख जणांना कोरोनाची लागण झाली आहे. दहा हजार मृत्यूमुखी पडले आहेत. अशा स्थितीत अमेरिकी जनतेला काहीतरी भरीव दिलासा देणं आवश्यक आहे. हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन किती प्रभावी आहे याबाबत अमेरिकेतले हेल्थ एक्सपर्ट आणि ट्रम्प यांच्यात मतभेद आहेत. परवाच्या पत्रकार परिषदेत तर पत्रकारांनी डॉक्टरांना विचारलेल्या प्रश्नावर ट्रम्प यांनी मध्येच घुसखोरी करत हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनचं समर्थन केलं.
Coronavirus | भारताचा मदतीचा हात, अमेरिकेसह शेजारील देशांना हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन औषध देणार
- हायड्रॉक्सीक्लोरोक्विन हे मलेरियासाठी वापरलं जाणारं औषध आहे.
- हाय रिस्क पॉप्युलेशन म्हणजे कोरोनावर उपचार करणारे डॉक्टर, नर्सेस, पेशंटचे नातेवाईक यांच्यासाठीच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते वापरावं असा आयसीएमआरचा स्पष्ट निर्देश आहेत.
- ते कोरोनावरचं औषध नसलं तरी लागण होऊ नये म्हणून ते वापरलं जातं आहे आणि त्याचे काही ठिकाणी सकारात्मक परिणाम मिळाले आहेत.
- पण अद्यापही कोरोनावरचं अधिकृत औषध ही मान्यता त्याला नाही.
कोरोना हे संपूर्ण जगावरचं, मानवजातीवरचं संकट आहे. त्यामुळे अशा स्थितीत आता हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनचा पुरवठा इतर राष्ट्रांना करण्यासाठी भारत सज्ज झाला आहे. अमेरिकेत येत्या नोव्हेंबरमध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होत आहे. त्यामुळे तिथल्या जनप्रक्षोभाला शांत करण्यासाठी ट्रम्प सरकारने याबाबत तात्काळ पावलं उचलली आहेत. आशा आहे की पीपीई कवच, टेस्टिंग किट अशा ज्या गोष्टींचा आपल्याकडे तुटवडा आहे त्या इतर देशांकडून मिळवून घेण्यात आपलीही कूटनीती यशस्वी ठरेल.
World Corona Update | जगभरात साडे 13 लाखांहून अधिक कोरोनाग्रस्त; अमेरिका, स्पेन, इटलीत कोरोनाचा कहर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
राजकारण
राजकारण
निवडणूक
Advertisement