(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कोटामध्ये अडकलेले उत्तरप्रदेशातील 7500 विद्यार्थी घरी परतणार; योगी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
योगी सरकारने राजस्थान मधील कोटा येथे अडकलेल्या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी पावलं उचलली आहेत. राजस्थान मधल्या कोटा येथे अडकलेल्या 7500 विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी अडीचशे बसेस पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
कोटा : कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे वेगवेळ्या राज्यांमध्ये कामासाठी गेलेल्या मजूरांपासून, शिक्षणासाठी गेलेले विद्यार्थीही अडकले आहेत. अशातच योगी सरकारने राजस्थान मधल्या कोटा येथे अडकलेल्या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी पावलं उचलली आहेत. राजस्थान मधल्या कोटा येथे अडकलेल्या 7500 विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी अडीचशे बसेस पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
राजस्थानमधील कोटा शहरात आयआयटी प्रवेश परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी देशभरातून येत असतात. 25 मार्चपासून सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे कोटामध्ये उत्तरप्रदेश, बिहारसह इतरही राज्यांतील विद्यार्थी अडकले आहेत. 21 दिवसांच्या लॉकडाऊनमुळे त्यांचे हात होत आहेत. तसेच या विद्यार्थ्यांनी घरी परतण्यासाठी सोशल मीडियावर एक अभियानही सुरू केलं होतं. याच पार्श्वभूमीवर या सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलं आहे. शनिवार आणि रविवार अशा दोन दिवसांत हे विद्यार्थी घरी परतणार आहेत.
कोटामध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांनी ट्विटर वर #SendUsBackHome हे अभियानही सुरू केलं होतं. याची दखल घेत प्रशासनानं विद्यार्थांना घरी आणण्यासाठी पावलं उचलण्यास सुरुवात केली. राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांनी योगी सरकारच्या कृतीचं स्वागत केलं आहे. इतर राज्यांनीही असं पाऊल उचलल्यास सहकार्य करू असं आश्वासनही त्यांनी दिलं आहे.
याआधी जम्मू-काश्मिर सरकारने कोटामध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी परवानगी मागितली होती. परंतु, त्यांना परवानगी नाकारण्यात आली होती. उत्तर प्रदेश सरकारने उचललेल्या पावलामुळे आता जम्मू-काश्मिरमधील विद्यार्थ्यांना परत घरी पाठवण्याची प्रक्रीया सुरू केली जाण्याची शक्यता आहे.
काय आहे प्रकरण?
राजस्थानमधील कोटा शहरात उत्तर प्रदेश-बिहार-झारखंडसह देशभरातील इतर राज्यांमधून हजारो विद्यार्थी मेडिकल आणि इंजिनिअरिंग विषयांच्या कोचिंगसाठी येत असतात. हे सर्व विद्यार्थी 25 मार्चपासून येथे अडकलेले आहेत. चिंतेचा विषय म्हणजे, कोटा शहरात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत आहे. सध्या या शहरात 64 कोरोना बाधित आहेत.
संबंधित बातम्या :
आनंदाची बातमी! देशात कोरोना व्हायरसचा संसर्ग होण्याचा वेग मंदावला : आरोग्य मंत्रालय
राज्याची आर्थिक घडी बसवण्यासाठी हालचाली सुरू; काही आर्थिक व्यवहारांना परवानगी