Coronavirus Updates : देशात 2670 सक्रिय रुग्ण, 'या' पाच राज्यांना धोका; सध्याची परिस्थिती काय?
Coronavirus Cases in India : भारतात गेल्या 24 तासांत 1,209 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
Coronavirus Cases Today in India : देशात 173 नवीन कोरोना रुग्ण आढळले असून 1,209 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. भारतातील कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने कमी होत आहे. ही दिलासादायक बाब आहे. जगभरात कोरोना विषाणू पुन्हा एकदा धुमाकूळ घालताना दिसत आहे. चीनपाठोपाठ जपानमध्ये कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. दोन्ही देशांमध्ये BF.7 व्हेरियंटचा संसर्ग पसरला असून कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. शिवाय अमेरिकेमध्ये XBB व्हेरियंट संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरल्याचे दिसत आहे. या तुलनेने भारतातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आहे. सरकारकडून योग्य उपाययोजना केल्या जात असून, नागरिकांना खबरदारी बाळगण्याचे आवाहन केले जात आहे.
देशात 2670 सक्रिय रुग्ण
भारतात गेल्या 24 तासांत 173 नवीन कोरोनाबाधित आढळले आहेत. चीन, जपान, ब्राझील, अमेरिकेसह दक्षिण कोरियामधील कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता केंद्र सरकार अलर्ट मोडमध्ये आले आहे. भारतात सध्या कोरोनाचे 2670 सक्रिय रुग्ण आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी, 2 जानेवारी नव्याने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना संसर्गाची प्रकरणे आता 4,46,78,822 वर पोहोचली आहेत. यामधील 4,41,45,445 रुग्ण कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत.
'या' पाच राज्यांमधील परिस्थिती चिंताजनक
देशात 2670 कोरोना रुग्ण उपचाराधीन आहेत. केरळ आणि कर्नाटक राज्यामध्ये सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत. देशातील निम्म्याहून अधिक कोरोनाचे रुग्ण फक्त केरळमध्ये आढळूत येत आहेत. त्यापाठोपाठ कर्नाटक आणि महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. केरळमध्ये 1,444 सक्रिय रुग्ण आहेत. त्यानंतर कर्नाटकमध्ये 326, महाराष्ट्रात 161, ओडिशात 88 आणि तामिळनाडूमध्ये 86 उपचाराधीन कोरोना रुग्ण आहेत.
कोरोनाचा धोका पाहता भारत सरकार अलर्ट मोडमध्ये
सध्य देशात नवीन प्रकरणांची नोंद होण्याचे प्रमाण कमी आहे, मात्र इतर देशांमधील कोरोना संसर्ग पाहता, प्रशासनाकडून योग्यती खबरदारी घेतली जात आहे. देशात चीन किंवा जपानसारखी परिस्थिती उद्भवू नये यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि राज्य सरकारे कठोर पावले उचलत आहेत. देशातील विमानतळांवर प्रवाशांना RT-PCR चाचणी बंधनकारक करण्यात आली असून प्रवाशांची रँडम कोविड चाचणीही केली जात आहे.
कोविड लसीकरणात तीन पटीने वाढ
कोरोनाच्या संभाव्य लाटेचा धोका पाहता प्रशासनाकडून नागरिकांना लसीकरणासाठी आवाहन केले जात आहे. प्रशासनाकडून नागरिकांना बूस्टर डोस घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर लोकांनी खबरदारी बाळगत बूस्टर डोस घेण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात कोरोना लसीकरणात तिपटीने वाढ झाली आहे.