(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Coronavirus | आज पंतप्रधान मोदींची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चर्चा
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक पार पडणार आहे. या बैठकीत देशातील कोरोना परिस्थितीचा आढावा आणि लॉकडाऊन संदर्भात चर्चा होऊ शकते, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
नवी दिल्ली : देशातील लॉकडाऊनचा शेवटचा आठवडा आजपासून सुरु झाला आहे. देशात लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरु असून 17 मे रोजी या लॉकडाऊनचा शेवटचा दिवस असणार आहे. अशातच देशातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, लॉकडाऊन 17 मे रोजी संपणार का? असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे. त्यामुळे संपूर्ण देशाचं लक्ष आज पार पडणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एका महत्त्वपूर्ण बैठकीकडे लागलं आहे. कोरोना विरोधात लढा देण्यासाठी देशाची तयारी आणि पुढिल रणनितीवर चर्चा करण्यासाठी आज पंतप्रधान आणि देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक पार पडणार आहे. ही बैठक दुपारी 3 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडणार आहे.
पंतप्रधान मोदी आणि सर्व मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत या मुद्द्यांवर होऊ शकते चर्चा
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींची ही पाचवी बैठक असणार आहे. आज पार पडणाऱ्या या बैठकीत देशात लॉकडाऊन लागू केल्यामुळे होणारे फायदे आणि देशात कोरोनाशी लढण्यासाठी आखण्यात येणाऱ्या पुढिल रणनितीवर चर्चा होऊ शकते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 मार्च, 2 एप्रिल, 11 एप्रिल आणि 27 एप्रिल रोजी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली होती. पंतप्रधानांच्या आजच्या बैठकीत लॉकडाऊनबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. याआधीही देशातील लॉकडाऊनबाबत पंतप्रधान मोदींनी सर्व राज्यांतील मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून त्या सर्वांची मतं जाणून घेतली होती.
- 20 मार्च रोजी सर्व मुख्यमंत्र्यांसोबत पार पडलेल्या बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 24 मार्चला देशात राष्ट्रव्यापी लॉकडाऊन जाहीर केला होता.
- 2 एप्रिल रोजी पार पडलेल्या बैठकीत अचानक लॉकडाऊन न हटवता, टप्याटप्यानं लॉकडाऊन उठवण्यावर सर्वांचं एकमत झालं होतं.
- 11 एप्रिल रोजी पार पडलेल्या बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी 14 एप्रिल रोजी संपणारा लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवला.
- 27 एप्रिलच्या बैठकीनंतर 1 मेपर्यंतच्या लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्याचा निर्णय घेण्यात आला.
कोरोना विरोधातील लढाईमध्ये देशाला सध्या तीन झोनमध्ये विभागण्यात आलं आहे. देशात सध्या 130 रेड झोन, 284 ऑरेंज झोन आणि 319 ग्रीन झोन आहेत. बैठकीत लॉकडाऊन उठवल्यानंतरची परिस्थिती आणि झोनबाबत तयार करण्यात आलेल्या नियमांबाबत चर्चा होऊ शकते.
राज्यांसमोरील अडचणी :
अनेक राज्यांनी रेड, ग्रीन आणि ऑरेंज झोनबाबतच्या नियमांवर आपल्या अडचणी मांडल्या आहेत.
राज्यांचं म्हणणं आहे की, प्रवासी मजुर आपापल्या राज्यांत प्रवास करून परतल्यामुळे कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे.
अशातच अनेक जिल्हे रेड झोनमध्ये आल्यामुळे लॉकडाऊनमध्ये देण्यात येणाऱ्या शिथीलतेवर परिणाम होत आहे.
तसेच, सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज पार पडणाऱ्या बैठकीत सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना बोलण्याची संधी दिली जाणार असून आतापर्यंतच्या बैठकींपैकी ही बैठक सर्वाधिक वेळ चालणार आहे.
संबंधित बातम्या : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल 12 मे पासून विशेष रेल्वे सेवा, पहिल्या टप्प्यात दिल्लीहून देशात 15 ठिकाणी वाहतूक