भारत-इंग्लंड दरम्यानची उड्डाणे 31 डिसेंबरनंतरही रद्द, नागरी उड्डाण मंत्रालयाचे संकेत
नागरी उड्डाण मंत्रालयाने कोरोना विषाणूचा नवीन प्रकार (स्ट्रेन) लक्षात घेता 23 ते 31 डिसेंबर दरम्यान इंग्लंड ते भारत उड्डाणे रद्द केली होती.
नवी दिल्ली : ब्रिटनहून भारतात परत आलेल्या सहा जणांमध्ये कोरोनाचा नवा विषाणू (स्ट्रेन) आढळला आहे. दरम्यान, विमान वाहतूक मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी याबाबत सांगितलं की, भारत आणि ब्रिटन दरम्यानच्या उड्डाणांची तात्पुरती स्थगिती थोडीशी वाढवावी लागेल. पुढील एक-दोन दिवसात आम्हाला अतिरिक्त पावले उचलण्याची गरज आहे की नाही किंवा तात्पुरती निलंबन शिथिल करण्यास सुरवात केव्हा होईल हे आम्हाला कळेल.
नागरी उड्डाण मंत्रालयाने कोरोना विषाणूचा नवीन प्रकार (स्ट्रेन) लक्षात घेता 23 ते 31 डिसेंबर दरम्यान इंग्लंड ते भारत उड्डाणे रद्द केली होती. आता 31 डिसेंबरनंतरही उड्डाणे रद्द केली जाऊ शकतात, असं हरदीपसिंह पुरी यांनी म्हटलं. ब्रिटनमध्ये आढळणारा हा कोरोना विषाणूचा नवीन प्रकार वेगाने पसरतो आणि तो अतिसंसर्गजन्य आहे.
ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा कहर, अनेक देशांच्या विमानसेवा स्थगित
भारतात कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनने बाधित एकूण सहा जण आढळले आहेत. भारत सरकारने याबाबत माहिती दिली आहे. युनायटेड किंग्डममधून परतलेल्या सहा जणांमध्ये कोरोनाचा नवीन जिनोम आढळला आहे. विशेष म्हणजे सध्यातरी एकही रुग्ण महाराष्ट्रातील नसून देशाच्या अन्य भागातील आहे. सहापैकी तीन जणांचे नमुने बंगळुरुच्या निमहंसमध्ये, दोघांचे हैदराबादच्या सीसीएमबी आणि चेन्नईतील रुग्णाचा नमुना पुण्याच्या एनआयव्हीमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्याच्या अहवालातून ही चिंताजनक माहिती समोर आली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, ब्रिटनमधून परतलेले हे सहा जण यूकेमध्ये आढळलेल्या सार्स कोवि-2 च्या नवे स्ट्रेनने संक्रमित आहेत.
या सहा जणांना स्वतंत्र खोलीत आयसोलेट केलं आहे. संबंधित राज्य सरकारांनी तयार केलेल्या विलगीकरण कक्षात त्यांना ठेवलं आहे. याशिवाय त्यांच्या कुटुंबीयांना तसंच त्यांच्या संपर्कातील लोकांना क्वारन्टीन करण्यात आलं आहे. तर इतर प्रवाशांची माहिती घेतली जात आहे.
या देशांमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन सापडला कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची सुरुवात ब्रिटनमधून झाली होती. यानंतर यूरोपातील अनेक देशांमध्ये नव्या स्ट्रेनने बाधित रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंतच्या माहितीनुसार, डेन्मार्क, नेदरलॅण्ड, ऑस्ट्रेलिया, इटली, स्वीडन, फ्रान्स, स्पेन, स्वित्झर्लंड, जर्मनी, कॅनडा, जपान, लेबनॉन, सिंगापूरमध्ये कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे रुग्ण सापडले आहेत. संबंधित बातम्या